वृत्तसंस्था/ टय़ुरीन (इटली)
2022 च्या निटो एटीपी पुरुषांच्या फायनल्स स्पर्धेला रविवारपासून येथे प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये अव्वल आठ टेनिसपटूंना प्रवेश दिला जातो. प्रत्येक वर्षअखेरीस ही स्पर्धा खेळवली जाते. स्पेनचा टॉपसिडेड राफेल नदाल आणि अमेरिकेचा टेलर फ्रिज यांच्यात पहिल्या फेरीतील लढत होणार आहे.
स्पेनच्या नदालला 2022 च्या टेनिस हंगामातील उत्तरार्ध म्हणावा तसा चांगला गेला नाही. काही चांगल्या आणि वाईट कारणांमुळे नदालने एटीपी टूरवरील आपला सूर गमविला दुखापतीची समस्या नदालला या वर्षभराच्या कालावधीत चांगलीच भेडसावली. गेल्या ऑक्टोबरमध्ये नदालला पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले. 2010 साली नदालने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. त्याचा आता या स्पर्धेतील सलामीचा सामना अमेरिकेच्या फ्रिजशी होणार आहे. फ्रिज आणि नदाल यांच्यात पहिल्यांदाच झालेल्या लढतीमध्ये फ्रिजने नदालचा 6-3, 7-6(7-5) असा पराभव करून इंडियन वेल्स चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. पोटाच्या दुखापतीमुळे नदालला चालू वर्षातील विम्बल्डन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. नॉर्वेचा कास्पर रुड आणि कॅनडाचा ऍलिसिमे यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.