स्पेनच्या राफेल नदालची कडवी सत्त्वपरीक्षा, रुनेकडून चमत्काराची अपेक्षा
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2023 सालातील टेनिस हंगामाला येथे सोमवारपासून ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. स्पेनचा या स्पर्धेतील विद्यमान विजेता आणि माजी टॉप सिडेड राफेल नदालला जेतेपद पुन्हा राखण्यासाठी कडव्या सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागेल. डेन्मार्कचा नवोदित होल्गेर रुने याच्याकडून या स्पर्धेत चमत्काराची अपेक्षा बाळगता येईल. ऑस्ट्रेलियाची माजी अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेती समंथा उर्फ सॅम स्टोसूर या स्पर्धेनंतर टेनिस क्षेत्रातून निवृत्त होत आहे.
डेन्मार्कचा नवोदित टेनिसपटू 19 वर्षीय रुनेने 2022 च्या टेनिस हंगामात एटीपी टूरवरील तीन स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात पॅरीस येथे झालेल्या एटीपी मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाचा समावेश आहे. सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविचला रुनेने पराभवाचा धक्का दिला होता. पॅरीसमध्ये झालेल्या एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात रुनेने जोकोविचला पराभूत करून पहिल्यांदा एटीपी मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 21 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. एटीपीच्या क्रमवारीत डेन्मार्कचा रुने सध्या दहाव्या स्थानावर आहे.
नदालची सत्त्वपरीक्षा
स्पेनचा माजी टॉप सिडेड आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेता राफेल नदालला सोमवारी या स्पर्धेत पहिल्या फेरीत ब्रिटनच्या नवोदित जॅक ड्रेपरशी लढत होणार आहे. जपानचा माजी विजेता नाओमी ओसाकाने या स्पर्धेतून माघार घेतली असल्याने नदालचा पहिल्या फेरीतील प्रतिस्पर्धी ड्रेपर राहिल. स्पेनचा 36 वर्षीय नदालला अलीकडच्या कालावधीत सात पैकी सहा सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली होती. यामध्ये चालू वर्षीच्या दोन सामन्यातील पराभवांचा समावेश आहे. ब्रिटनचा जॅक ड्रेपर हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये वावरत आहे. गेल्या आठवडय़ात 21 वर्षीय ड्रेपरने ऍडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारली होती. नदालला टेनिसचा बराच अनुभव असल्याने तो पुन्हा यावेळी या स्पर्धेत जेतेपद स्वतःकडे राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. गेल्या वर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा पाच सेटस्मधील लढतीत पराभव करत जेतेपद पटकाविले होते. डॅनिल मेदव्हेदेवचा या स्पर्धेतील सलामीचा सामना अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनशी होणार आहे. 2009 साली मेदव्हेदेवने जोकोविचच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. जोकोविचने ही स्पर्धा आतापर्यंत नऊवेळा जिंकली आहे. 35 वर्षीय जोकोविचचा या स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी स्पेनच्या रॉबर्टो बायेनाशी होणार आहे. गेल्या आठवडय़ात जोकोविचने ऍडलेडमधील टेनिस स्पर्धा जिंकली होती तर तत्पुर्वी म्हणजे 2022 च्या अखेरीस त्याने एटीपी फायनल्स स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. नॉर्वेचा कास्पर रुड, ग्रीकचा सिटसिपेस हे या स्पर्धेत अव्वल समजले जातात. मात्र, दुखापतीमुळे स्पेनचा नवोदित कार्लोस ऍलकॅरेझने माघार घेतली आहे. सिटसिपेसचा सलामीचा सामना फ्रान्सच्या हॅलेसबरोबर होणार आहे.
महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक पुन्हा यावेळी जेतेपदासाठी फेररिट म्हणून ओळखली जाते. महिलांच्या टेनिसमध्ये अलीकडच्या कालावधीत स्वायटेकच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. गेल्यावर्षीच्या मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाची टॉपसिडेड ऍस्ले बार्टीने टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर स्वायटेकने महिलांच्या टेनिसमध्ये आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले. 2022 च्या कालावधीत स्वायटेकने डब्ल्यूटीए टूरवरील 8 स्पर्धा जिंकल्या असून आपल्या गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत तिने प्रेंच आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धांचे अजिंक्यपद मिळवले आहे. अमेरिकेची सेरेना विलियम्स तसेच या स्पर्धेतील माजी विजेती नाओमी ओसाका यावेळी या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. ओसाकाने दुखापतीमुळे आपण उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे कळविले आहे. अमेरिकेच्या सोफिया केनिनने 2020 साली ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. बेलारुसची माजी टॉप सिडेड अझारेंका या स्पर्धेत अधिक मजल मारेल असे वाटत नाही. पोलंडच्या स्वायटेकचा सोमवारी सलामीचा सामना जर्मनीच्या निमेरशी होणार आहे. अमेरिकेची 28 वर्षीय जेसिका पेगुला हिचा सलामीचा सामना रुमानियाच्या ख्रिस्टेनशी तसेच ग्रीसच्या सहाव्या मानांकित मारिया सॅकेरी त्याचप्रमाणे अमेरिकेची सातवी मानांकित कोको गॉफ यांचे सलामीचा सामने सोमवारी होत आहेत. सॅकेरी आणि अझारेंका तर गॉफ आणि केनिन अशा पहिल्या फेरीतील लढती राहतील.
स्टोसूरकडून निवृत्तीचे संकेत
ऑस्ट्रेलियाची माजी टॉप सिडेड महिला टेनिसपटू त्याचप्रमाणे अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेती समंथा उर्फ सॅम स्टोसूर ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. शनिवारी स्टोसूरने ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. 21 वर्षापूर्वी स्टोसूरने मेलबोर्न पार्कच्या टेनिस कोर्टवर ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत आपले आंतरराष्ट्रीय टेनिस पदार्पण केले होते. 38 वर्षीय स्टोसूरने 2011 साली झालेल्या अमेरिकन गडस्लॅम स्पर्धेत अंतिम सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विलियम्सचा पराभव करत अजिंक्यपद मिळवले होते तर. 2010 साली तिने प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. स्टोसूरने आतापर्यंत आपल्या टेनिस कारकीर्दीत महिलांच्या दुहेरीत तसेच मिश्र दुहेरी अनुक्रमे चार आणि तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहे. ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत स्टोसूर फ्रान्सच्या कॉर्नेटबरोबर महिला दुहेरीत तर ऑस्ट्रेलियाच्या एब्डन समवेत मिश्र दुहेरीत खेळणार आहे.