नाताळ सुट्टीपासून पर्यटकांनी लावली हजेरी
प्रतिनिधी/ गुहागर
24 डिसेंबरचा चौथा शनिवार, त्याला जोडून आलेला रविवार यामुळे 24 डिसेंबरपासूनच जिल्हय़ातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. गुहागर तालुक्यातही पर्यटकांनी जोरदार हजेरी लावली आहे. स्वच्छ व सुंदर निसर्गसौंदर्याबरोबर चौपाटीवरील मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे रूजू झाले आहेत. समुद्रचौपाटीवरील वॉटरस्पोर्ट पर्यंटकांसाठी खास आकर्षणाचा भाग ठरत आहे.
कोविडनंतर गुहागरचे पर्यटन अधिक खुलू लागले आहे. मुंबई-गोवा हायवेच्या झालेल्या दुरवस्थेमुळे पर्यटक त्रासलेला असला तरी गुहागर भेटीला पसंती देत आहे. गुहागरात 21 डिसेंबरपासूनच पर्यंटकांनी हजेरी लावली आहे. यामध्ये सर्वाधिक 24 व 25 डिसेंबर रोजी गर्दी दिसून येत आहे. वर्ष अखेरचा दिवस हा सुट्टीचा नसल्याने 31 डिसेंबर रोजीची गर्दी कमी आहे. मात्र 2022 चा शेवटचा आठवडा गुहागर तालुक्यातील गुहागर शहराबरोबर वेळणेश्वर, हेदवी, शृंगारतळी आदी लॉज व निवास न्हायारी योजनांमध्ये पर्यटकांचे मोठय़ा प्रमाणात बुकींग झाले आहे. गुहागरची 6 किलोमीटरची स्वच्छ व सुंदर समुद्रचौपाटी, वेळणेश्वर, हेदवीतील बामणघळ, हेदवीतील दशभुज लक्ष्मीगणेश, अंजनवेलमधील दीपगृह, गोपाळगड किल्ला आदी भागाला पर्यटक भेटी देत आहेत. गुहागर हे पर्यटनदृष्टय़ा जिल्ह्य़ाचे केंद्रस्थान असल्याने गुहागरमध्ये अधिक वस्ती करून गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटनही पर्यटक करत आहेत. गेली 2 वर्षे गुहागर समुद्रचौपाटीवर वॉटरस्पोर्ट नव्हते. नगरसेवक उमेश भोसले यांनी या कठीण परिस्थितीतही केवळ गुहागरात येणाऱया पर्यटकांना वॉटरस्पोर्ट मिळावे म्हणून गुहागर समुद्रचौपाटीवर वॉटरस्पोर्ट सुरू केले आहे. यामुळे गुहागर तालुक्यासाठी जमेची बाजू ठरली असून पर्यटन अधिकाधिक वाढीसाठी सहकार्य होत आहे.
उकडीचे मोदक, काजुगराच्या भाजीला पसंती
येणारा पर्यटक हा प्राचीन देवस्थानांना भेट देत आहे. उकडीचे मोदक, काजुगराची भाजी अधिक पसंतीचे ठरत आहे. सुरमई, पापलेट आदी कोकणातील मच्छीचे जेवणही पर्यटकांना दिले जात असून घरगुती व्यवस्था सर्वाधिक फायदेशीर ठरत आहे. तालुक्यातही पर्यटकांच्या सेवेसाठी निवास व्यवस्था, लॉज यांची उत्तम व्यवस्था असल्याने पर्यटकांची वस्ती वाढत आहे. या वर्षअखेरीस सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी गुहागरमध्ये मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली आहे.