फ्लोरिडा : पोलंडची महिला टेनिसपटू इगा स्वायटेकने महिला टेनिस संघटनेच्या (डब्ल्यूटीए) टूरवरील 2022 च्या टेनिस हंगामातील सर्वोत्तम महिला टेनिसपटू बहुमान मिळवला आहे. 2020 च्या टेनिस हंगामामध्ये स्वायटेकची डब्ल्यूटी टूरतर्फे सर्वोत्तम नवोदित महिला टेनिसपटू म्हणून निवड करण्यात आली होती पण त्यानंतर केवळ दोन वर्षांच्या कालावधीत स्वायटेकने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर डब्ल्यूटीएचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा बहुमान पटकावला. पोलंडची स्वायटेक ही महिला टेनिसपटूंच्या एकेरीच्या मानांकनात अग्रस्थानावर आहे. तिने 2022 च्या टेनिस हंगामात 8 स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये तिने सलग 37 एकेरीचे सामने जिंकून सलग सहा स्पर्धा जिंकल्या आहेत. स्वायटेकने चालू वर्षीच्या टेनिस हंगामात फ्रेंच ग्रँडस्लॅम आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून त्याचप्रमाणे डब्ल्यूटीए टूरवरील कतारची 1000 दर्जाची स्पर्धा, त्यानंतर इंडियन वेल्समधील बीएनपी पेरीबस स्पर्धा, मियामी खुली टेनिस स्पर्धा, स्टुटगार्टमधील पोर्श्च टेनिस ग्रा प्रि स्पर्धा जिंकल्या आहेत.
2022 च्या टेनिस हंगामात डेविड विट याची डब्ल्यूटीए सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. डेविड विट हे सध्या जेसिका पेगुलाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. या टेनिस हंगामात झेकच्या बार्बोरा क्रेसिकोव्हा आणि पॅटरीना सिनियाकोव्हा यांना दुहेरीतील सर्वोत्तम जोडी म्हणून जाहीर करण्यात आले.
या जोडीने हा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा पटकावला आहे. झेकच्या या जोडीने चालू वर्षीच्या टेनिस हंगामात तीन प्रमुख स्पर्धांमध्ये महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले आहे. 2022 च्या टेनिस हंगामात झेंग क्विन वेनची डब्ल्यूटीए टूरवरील सर्वोत्तम नवोदित टेनिसपटू म्हणून निवड करण्यात आली.