पोलिसांच्या गळाला अद्याप छोटेच मासे : मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतरही पोलिसांकडून डोळेझाक.विदेशी नागरिकांकडून ड्रग्ज पकडून सरकारच्या डोळय़ात धूळफेक,मोठय़ा साठेबाजांची पाठराखण होते की काय?
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यातील सर्व ड्रग्ज पॅडलरर्सच्या मुसक्या आवळल्या जातील. या प्रकरणी एएनसीमध्ये या कामी अन्य पोलिसांची नियुक्ती केली जावी, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिला. त्यानंतर पोलीस आपल्या कामाला लागले असलेतरी त्यांच्या गळाला अद्याप मोठे मासे लागलेले नाहीत. ड्रग्ज व्यावसायिक किनारी भागापासून वाळपईपर्यंत खेडय़ापाडय़ात पोचला असलातरी पोलीस मात्र गृहखात्यासह सरकारच्या डोळय़ात धूळफेक करण्यासाठी केवळ 6 हजार रुपयांचे अमली पदार्थ तेही विदेशी नागरिकांकडून जप्त करतात. यातून पोलिसांचा ड्रग्ज पॅडलरला खरोखरच आशीर्वाद आहेत काय? असे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
किनारी भागात मोठय़ा प्रमाणात ड्रग्जचे साठेबाज आहेत. त्या बडय़ा माशांकडे मात्र पोलीस लक्ष देत नाहीत, असा आरोप हणजूण, वागातोर, कळंगूट कांदोळी किनारी भागातील नागरिकांकडून होत आहे. सहा हजार रुपयांचा ड्रग्ज पकडून पोलीस काय सिद्ध करू पाहत आहेत. जे कोण मोठे ड्रग्ज पॅडलर आहेत. ते मात्र मोकाट फिरत आहेत. पोलिसही त्यांच्याकडे जाणून बजून दुर्लक्ष करीत आहेत, हे तितकेच सत्य आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना दाखविण्यासाठी ही सरकारच्या डोळय़ात निव्वळ धूळफेक करणारी गोष्ट म्हणावी लागेल.
क्लब 9 बारमध्ये होणारी पार्टी बंद पाडली, 90 हजारांचा ड्रग्ज जप्त
वागातोर वझरान येथील क्लब 9 बारमध्ये सुरू असलेली रेव्हपार्टी हणजूण पोलिसांनी पहाटे बंद पाडून एकाला ताब्यात घेतले. हणजूण पोलीस व एएनसी पोलीस पथकाने ही कारवाई केली. मिथून गोपाळ (बंगळूरू) या संशयिताला अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडून 90 हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. येथे पार्टीचे आयोजन केल्या प्रकरणी वेन डेव्हीस(34, बंगळूरू) याला अटक केली आहे. उत्तर गोव्याचे अधीक्षक शेबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जिवबा दळवी, हणजूण पोलीस निरीक्षक प्रशल देसाई, एएनसीचे निरीक्षक अरुण देसाई यांनी ही कारवाई केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 बार मालक वागातोर दाभोळवाडा येथील नागरिक असून त्यांनी हे बार चालविण्यासाठी वेन डेव्हीस याला दिले होते. तो येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. याप्रकरणी पोलिसांनी वेन डेव्हीस याला ताब्यात घेतले आहे.
60 हजारांचा चरस, एसडीएम जप्त
झोरवाडा हणजूण येथील डिडायझुमा(25) तसेच कार्लूस शाजे(25) या टानझियन तरुणांना हणजूण पोलिसांनी शनिवार सकाळी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चरस तसेच एसडीएम हा मादक पदार्थ मिळून 60 हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. या ड्रग्ज व्यवहरांशी संबंधित अन्य एका बडय़ा स्थानिक व्यावसायिकाचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांही संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
सहा हजारांच गांजा जप्त
हणजूण पोलिसांनी उदय दसवानी(22, मनेमा गुजरात) याला गांजासह रंगेहाथ पकडले. बाजारपेठेत या गांजाची किंमत सहा हजार रुपये होते. संशयित हणजूण येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी यांना मिळाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक साहिल वारंग यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शखाली पुढील चौकशी सुरू आहे.
ड्रग्जच्या विळख्यामुळे गोव्याचे बदनाम
राज्यात सोनाली फोगट प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असतानाच राज्यात ड्रग्जचा विळखा अधिक घट्ट होत आहे. यामुळे गोव्याचे नाव सर्वत्र बदनाम होत असतानाच पोलिसांना केवळ छोटे मासेच गळाला लागतात. ही गोष्ट लज्जास्पद म्हणावी लागेल. ड्रग्जचा राज्यातून कायमचा नायनाट करण्यात येईल व ड्रग्ज पॅडलरांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीरपणे सांगितले असले तरी पोलिसांकडून छोटे मासे पकडण्याचे गुपित काय आहे. असा किनारी भागात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात ड्रग्जचा साठा करणारे बडे मासे मात्र पोलिसांच्या हातील लागत नाही. ही गांभार्याची गोष्ट आहे. 50 ते 60 हजारांचा अमली पदार्थ जप्त करून पोलीस एक प्रकारे सरकारच्या डोळय़ात धूळफेक करत असल्याचा आरोप आता राज्यभरातून होऊ लागला आहे. अमली पदार्थ विरोधी पोलीस पथक विदेशी नागरिकांना पकडतात. मात्र पोलिसांना ड्रग्जचे साठेबाज सापडत नाही. ही लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल.
राज्यात हणजूण कळंगूट, म्हापसा, डिचोली ते वाळपई, पेडणे आदी ठिकाणी सर्वत्र अमली पदार्थ व्यवसाय फैलावलेला आहे. त्यात तरुण पिढीही आज ड्रग्जच्या आहारी गेली आहे. असे असताना पोलिसांच्या गळाला मोठे ड्रग्ज साठेबाज लागत नाहीत. ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी आहे. खरोखरच पोलीस त्या साठेबाजांचे पाठराखण करत नसतील ना? पोलिसांचा ड्रग्ज पॅडलरना खरोखरच आशीर्वाद आहे काय? असे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
बेकायदा वास्तव्य प्रकरणी चार विदेश महिला ताब्यात
व्हीजा संपूनही अधिक काळ गोव्यात वास्तव्य करून राहिल्या प्रकरणी हणजूण पोलिसांनी चार विदेशी महिलांना ताब्यात घेतले. यात मावना मानका(40, तानझानियन) रोशन कायरिहा(31,उगांडा), सुब्रिया मालिक(25, तानझनियन), इदिथ नामपिजा (25, उगांडा) या चार विदेशी महिला नागरिकांचा समावेश आहे. अधीक्षक शोबित सक्सेना या प्रकरणी अधिक तापास करत आहेत.