बाजारात नवरात्रोत्सवाचे साहित्य दाखल : खरेदीसाठी तरुणाईचा प्रतिसाद : गरबा-दांडिया पोशाखाला मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात नवरात्रोत्सवात रंग भरणाऱया दांडियाच्या टिपऱया आणि इतर विविध साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे बाजारपेठ नवरात्रोत्सवाच्या साहित्यांनी बहरलेली दिसत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा सर्वत्र गरबा-दांडियाचे तरुणाईला वेध लागले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी वर्दळ वाढलेली दिसून येत आहे.
बाजारात आकर्षक अशा बेअरिंग फायबर, घुंगरू, रिबिन लावलेल्या लाकडी फायबर आणि स्टीलच्या टिपऱया विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. साधारण 30 रु. ते 150 रुपयांपर्यंत टिपऱयांचे दर आहेत. याबरोबरच दौडमध्ये सहभागी होणाऱया तरुणाईसाठी पांढऱया टोप्या व पोषाख, भगवे फेटे, झेंडे, पताका आणि विशेष कुडत्यांची मागणी वाढली आहे. कोरोनामुळे दोन वर्षात नवरात्रोत्सव आणि दौड मर्यादित स्वरुपात झाली होती. मात्र, यंदा पुन्हा नवरात्रोत्सव आणि दौड मोठय़ा उत्साहात साजरी करण्यासाठी तरुणाईची लगबग पाहायला मिळत आहे.
शहर-ग्रामीण भागात दौडचा विस्तार
शहर आणि ग्रामीण भागात दुर्गामाता मंदिरांची स्वच्छता व रंगरंगोटी करून मंदिरे सज्ज केली जात आहेत. शहराबरोबर ग्रामीण भागात काढल्या जाणाऱया दौडचा विस्तार वाढला आहे. सहभागी होणाऱया तरुणाईची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बाजारात नवरात्रोत्सव साहित्याच्या खरेदीसाठी तरुणाईची वर्दळ पाहायला मिळत आहे.
नऊ दिवस चालणाऱया नवरात्रोत्सवात गरबा-दांडियाचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते. तरुणाई पारंपरिक पोषाख घालून सहभागी होते. त्यामुळे बाजारात गरबा-दांडियाच्या पोशाखाला मागणी वाढली आहे. साधारण तीन वर्षांच्या बालकापासून 40 वर्षांच्या तरुणापर्यंत विविध रंगांमध्ये पोषाख उपलब्ध आहेत. 300 ते 1200 रुपयांपर्यंत विशेष पोशाखांच्या किमती आहेत. नवरात्रोत्सवात दांडियासाठी युवक-युवतींकडून पारंपरिक वेशभूषा केली जाते. युवतींकडून दागिन्यांचा साज परिधान केला जातो. त्यामुळे बेंटेक्सच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे. दागिन्यांच्या तब्बल 50 प्रकारच्या डिझाईन विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत.
सोमवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ
शहरातील पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, मेणसी गल्ली आदींसह इतर ठिकाणी नवरात्रोत्सवाचे साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे दुकानेही साहित्याने झगमगत आहेत. येत्या सोमवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार असल्याने नवरात्रोत्सवाच्या साहित्याची खरेदी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे.