इको-सेन्सिटिव्ह झोनच्या मुद्दय़ावर झाली चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जात भेट घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या दोन्ही नेत्यांच्या भेटीची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत. पंतप्रधान आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांमध्ये इको-सेन्सिटिव्ह झोनच्या मुद्दय़ावर चर्चा झाल्याचे समजते.
कासरगोड जिल्हय़ातला तिरुअनंतपुरमशी जोडणाऱया सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्प ‘सिल्व्हरलाइन’ला अद्याप केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे राज्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ‘सिल्व्हरलाइन’ रेल्वे प्रकल्प तसेच आर्थिक सहाय्याबद्दल पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये खाणकामाची अनुमती देता यत नाही. संरक्षित जंगलाच्या इको सेन्सिटिव्ह झोनची कक्षा एक किलोमीटर असावी असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये स्थयी निर्मितीकार्यावर बंदी घातली जावी असाही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तर सिल्व्हरलाइन हा रेल्वे प्रकल्प वनक्षेत्रातून जाणार असल्याने याकरता केंद्र सरकारच्या वन मंत्रालयची मंजुरी मिळणे आवश्यक ठरले आहे. विजयन यांच्यासाठी सिल्व्हरलाइन हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय ठरल्याने ते केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवू पाहत असल्याची चर्चा आहे.