प्रयोग, व्यवसायाची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय बांधकाम आणि स्थावर मालमत्ता विकास क्षेत्रासाठी रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी) स्थापन केला जाणार आहे. भारतात अशा प्रकारचा हा प्रथमच प्रयोग आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार आणि मालमत्ता विकासक आता मोठय़ा प्रमाणात आपल्या स्थावर मालमत्तेचे चलनीकरण (मोनेटायझेशन) करत असताना त्यांची या संस्थेमुळे सोय होईल, अशी शक्यता आहे.
कोरोना उद्रेकानंतरच्या काळात पुन्हा मालमत्ता विकास क्षेत्रात गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. भारतात केवळ कार्यालयीन क्षेत्रात अशा विश्वस्त संस्थांची संकल्पना उपयोगात आणली जाते. पण आता ती सर्व प्रकारच्या मालमत्ता व्यवहारांसाठी लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती देण्यात आली.
ही संस्था सर्व प्रकारच्या रिटेल मालमत्तांसाठी असेल. तिचे स्वागत अनेक मालमत्ता विकासकांनी केले आहे. भारताच्या रिटेल मालमत्ता क्षेत्रात अनेक जागतिक गुंतवणूकदार आता स्वारस्य दाखवित आहेत. ते एकतर विकसित मालमत्तांमधील भाग विकत घेत आहेत किंवा ग्रीनफिल्ड डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून रिटेल मालमत्ता विकत घेत आहेत. या व्यवहारांमध्ये सुसूत्रता असावी यासाठी या विश्वस्त संस्थेचा उपयोग होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.
आरईआयटी ही विश्वस्त संस्था काय आहे?
आरईआयटी ही संस्था शहर भागातील किंवा महत्त्वाच्या व्यवसाय भागातील किंवा एखाद्या देशातील रिटेल मालमत्तांचे व्यवस्थापन करते. आपल्या व्यवस्थापनाधीन असणाऱया रिटेल मालमत्ता कंपनी किंवा संस्थांना भाडय़ाने देणे, कुणाला दुकान किंवा शॉपिंग मॉल, धान्य दुकान, कापड दुकान इत्यादी व्यवसाय करायचा असेल तर त्याला जागा भाडय़ाने देणे इत्यादी कामे ही संस्था करते. अशा जागा मासिक, त्रैमासिक, षट्मासिक किंवा वार्षिक भाडेतत्वावर दिल्या जाऊ शकतात. संस्था त्यांच्याकडून भाडे घेते. नंतर हे भाडे जागेच्या मूळ मालकाला दिले जाते. देताना संस्था स्वतःच्या खर्चासाठी थोडी रक्कम कापून घेते.
अनेक देशांमध्ये लोकप्रिय
अशा संस्था अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अशा संस्था आता स्थिरावल्या आहेत. या संस्थांचे व्यवहार पारदर्शी असल्याने नंतर कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता अगदीच कमी असते. समस्या निर्माण झाली तरी ती संस्था स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडते. त्यामुळे मूळ मालकाला या सर्वांमध्ये आपला वेळ खर्च करावा लागत नाही. त्याला त्याच्या मालमत्तेचे भाडे विनासायास मिळत राहते.
वाढीसाठी उपयुक्त
भारतात आता रिटेल मालमत्ता क्षेत्राचा मोठय़ा प्रमाणात विकास होत आहे. या विकासाची गती वाढण्यासाठी अशी संस्था उपयोगी ठरते असा जगभरातील अनुभव आहे. भविष्यकाळात या क्षेत्रातील भारतीय गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात वाढणार याचे संकेत मिळत असताना या क्षेत्राची विश्वासार्हता वाढविण्यासाठी आणि गुणवत्तेच्या जागतिक निकषावर भारतातील हे क्षेत्र टिकून राहण्यासाठी अशा संस्था महत्त्वाचे योगदान करणार आहेत, हे या क्षेत्रातील बव्हंशी व्यवहारकर्त्यांना मान्य आहे.