कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील शिक्षक नियुक्ती घोटाळय़ातील आरोपी, तृणमूल काँगेसचे नेते आणि माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची 46 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. या मालमत्तेत त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांचाही वाटा आहे. या दोघांनीही शिक्षक नियुक्तीत भ्रष्टाचार करुन बेकायदेशीररित्या प्रचंड संपत्ती कमावली, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेत 40 स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. त्याच्यात फार्म हाऊस, सदनिका, कोलकाता येथील मध्यवर्ती स्थानी असणारा भूखंड इत्यादींचा समावेश आहे. स्थावर मालमत्तेची बाजारी किंमत 40.33 कोटी रुपये आहे. तर 35 बँक खात्यांमध्ये जमा असलेले 7.89 कोटी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी हे दोघेही या मालमत्तेचे संयुक्त लाभार्थी असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या पार्थ चॅटर्जी यांना या भ्रष्टाचारप्रकरणी जुलै 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर टाकलेल्या धाडींमध्ये एकंदर 49.80 कोटी रुपयांची रोख रक्कम, 55 कोटी रुपयांचे सोने आणि दागदागिने व इतर जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली होती. हे प्रकरण देशभर गाजले होते.