वृत्तसंस्था / हैदराबाद
पोटच्या मुलाने आईच्या बँक खात्यातील सर्व 36 लाख रुपये मोबाईल गेम्समध्ये खर्च केल्याने आईवर अक्षरश: कफल्लक होण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे. हा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. त्याने आपल्या आजीच्या मोबाईलचा उपयोग करुन हा उपद्व्याप केल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली. या प्रकरणी तक्रार नोंद करण्यात आली आहे. या मुलाने प्रथम विनामूल्य फायर गेम अॅप डाऊनलोड करुन घेतले. नंतर तो आपल्या आईच्या बँक खात्यातील पैसे या गेम्सवर लावू लागला. एकावेळी तो साधारणत: 1.50 लाख ते 2 लाख रुपये या गेमवर खर्च करीत असे. अशा प्रकारे त्याने काही दिवसांमध्येच जवळपास 36 लाख रुपये उधळल्याचे उघड झाले आहे. आईवडिलांनी आपले मोबाईल मुलांना देऊ नयेत. तसेच त्यांना आपल्या बँक खात्यांची माहिती किंवा पासवर्ड देऊ नये, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.