शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान ठरले तिसरे अध्यक्ष
@ अबुधाबी / वृत्तसंस्था
अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची शनिवारी संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) नवीन राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली. 61 वषीय मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे देशाचे तिसरे राष्ट्राध्यक्ष असतील. संयुक्त अरब अमिरातीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे वयाच्या 73 व्या वषी निधन झाल्यानंतर त्यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार यासंबंधी जगभरात उत्सुकता होती. शेख मोहम्मद हे संयुक्त अरब अमिराती सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर देखील असतील. शेख मोहम्मद यांची संयुक्त अरब अमिरातीच्या फेडरल सुप्रीम कौन्सिलने निवड केली आहे. क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान पुन्हा निवडणुकीसाठी पात्र होण्यापूर्वी पाच वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्राध्यक्षपद सांभाळतील.
शेख झायेद बिन सुलतान यांनी 1971 मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या स्थापनेनंतर 2 नोव्हेंबर 2004 पर्यंत पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर, शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांची उत्तराधिकारी म्हणून युएईचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या कारकिर्दीत युएईचा झपाटय़ाने विकास झाला. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनानंतर यूएईमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शेख यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींबरोबरच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे.