आझादनगर-मडगाव येथील घटना : खून प्रकरणी पाच तरुणांना अटक
प्रतिनिधी / मडगाव
आझादनगर-मडगाव येथील एका रेस्टॉरंटमध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आलेल्या युवकाचा किरकोळ वादावरुन खून करण्यात आला. याखून प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. खून झाला त्या युवकाचे नाव मुख्तार बदनी (25) असे आहे.
पोलिसांनी कोलमरड – मडगाव येथील महम्मद हुसैन शेख (31), आझादनगर – मडगाव येथील असिफ अफ्रातान नागरची (29), विनोद जलगार (30), सुरेश जलगार (29) व अक्षय भोवे (24) याना अटक केली आहे.
महम्मद हुसैन हा एका कपडय़ाच्या दुकानातील कर्मचारी आहे तर असिफ अफ्रातान नागरची हा ताडपत्री व्यवसायात आहे. अक्षय भोवे हा नृत्य शिक्षक असून विनोद जलगार हा मडगावातील एका पादत्राणे शोरुममध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा आहे. अटक करण्यात आलेल्या या पाचही आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 148, 324, 302 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाढदिवसाला न बोलावल्याने वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार 13 जुलै रोजी मुख्तार बदनी याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस आझादनगर- मडगाव येथील रेस्टॉरंटमध्ये साजरा होत होता. वाढदिवस साजरा करण्याची प्रक्रिया ऐन रंगात ओलेली असताना मुख्तार बदनी याच्या एका मित्र मंडळाने यावेळी या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला आणि जवळचे मित्र असूनही या वाढदिवसाला का बोलावले नाही यावरुन वाद सुरु झाला.
बर्थ डे बॉयचाच केला खून
शब्दाला शब्द वाढत गेले आणि नंतर हाणामारीचा प्रकार सुरु झाला. एव्हाना 13 रोजीची मध्यरात्र झाली होती. त्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपींनी लाकडी दंडुक्याने मुख्तार बदनी याल मारहाण केली. मुख्तार बदनी हालचाल करीत नसल्याचे पाहून त्याला मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मध्यरात्रीनंतर डय़ुटीवर असलेल्या डॉक्टरांनी मुख्तार बदनी याला ‘मृतावस्थेत आणले’ अशी नोंद केली.
तीन निरीक्षकांकडे सोपविला तपास
मडगाव पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी ती वरिष्ठ अधिकाऱयांच्या कानी घातली आणि त्याचवेळी वरिष्ठ अधिकाऱयांनी तीन पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांना या खून प्रकरणाचा उलगडा करण्याचा आदेश दिला. नव्यानेच ताबा घेतलेले मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक फिलोमेना कॉता, कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक आणि मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांना या खून प्रकरणाचा तपास करण्याच्या कामात सहकार्य करण्याचा आदेश देण्यात आला.
वेळ न दवडता या तिन्ह पोलीस निरीक्षकांनी तपासाची दिशा निश्चित केली आणि काही तासातच या प्रकरणातील सर्व पाचही आरोपींना अटक केली.