2013 च्या जानेवारी महिन्यात घरातून शाळेला गेलेली एक सात वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. पालक व इतर नातेवाईकांनी तिला शोध शोध शोधले. तथापि, दहा वर्षे तिचा काहीही पत्ता लागला नाही. त्यामुळे सरकारी नोंदीत तिला बेपत्ता म्हणून घोषित करण्यात आले. तसेच तिला ‘मिसिंग गर्ल नं. 166’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ती मुलगी दोन दिवसांपूर्वी अर्थात 4 ऑगस्ट 2022 ला सापडली.
यात आश्चर्य काय? असे अनेकांना वाटेल. कारण अशी अनेक बालके बेपत्ता होत असतात आणि त्यापैकी अनेकांचा नंतर शोधही लागत असतो. काही बालकांचा शोध लागण्यासाठी अनेक वर्षे जातात. तथापि, अखेर त्यांचे आपल्या कुटुंबाशी मीलन होते आणि शेवट गोड होतो. अशा अनेक घटना घडल्या आहेत. तथापि, वरील घटनेचे वैशिष्टय़ असे, की ही मुलगी दहा वर्षे आपल्या घरापासून अवघी 500 मीटर अंतरावर होती. तरीही तिचा पत्ता लागला नाही. तसेच ती स्वतःही घरी येऊ शकली नाही. 2013 मध्ये ती घरातून निघाल्यानंतर एका निःसंतान मनुष्याने तिने अपहरण केले. तिला आपल्या घरी आपल्या मुलीसारखे वाढविले. त्यामुळे मुलगीही त्याच्या घरात आनंदाने राहिली. त्याचे घर मुलीच्या घरापासून अवघे अर्ध्या किलोमीटर अंतरावर होते. इतक्या जवळ असूनही मुलीचा शोध पोलिसांनाही लागला नाही. कारण त्यांनी दूर अंतरावर शोध घेण्याचा प्रयत्न चालविला होता. बेपत्ता मुलगी इतक्या जवळच असेल, याची त्यांनाही कल्पना नव्हती. त्यामुळे मुलीच्या पालकांच्या सांगण्यावरून त्यांनी अनेक दूरदूरच्या ठिकाणी तसेच परराज्यामध्येही शोध घेतला. तथापि, तो प्रयत्न असफल ठरला. तिची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली. तथापि, अपहरण करणाऱया व्यक्तीने मुलीला प्रेमाने सांभाळल्यामुळे या अपहरणाचा गाजावाजा कोठेही झाला नाही. अपहरण केल्यानंतर काही वर्षांनी त्याने मुलीला कर्नाटकात पाठवून दिले. त्यामुळे नंतर मुलीचा शोध थांबवण्यात आला.
अपहरण करणाऱया व्यक्तीचे नाव डिसुझा असे असून त्याची सोनी नामक पत्नी आहे. त्यांना बरीच वर्षे संतान नसल्याने त्यांनी अपहरणाचा गुन्हा केला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये त्यांना अपत्यप्राप्ती झाली. नंतर त्यांना दोन्ही मुलांचा खर्च सांभाळणे कठीण होऊ लागले. तोपर्यंत ही मुलगी पंधरा वर्षांची झाली होती. नंतर त्यांनी तिला कर्नाटकातून पुन्हा बोलावून घेतले आणि तिला बेबी सिटींगचे काम दिले. त्यांनी आपले घरही कालांतराने बदलले.
नंतर या मुलीचा शोध एका पोलीस अधिकाऱयाला लागला. डिसुझा दांपत्याची चौकशी केल्यानंतर त्यांना खरे सांगावे लागले. आता या मुलीला दहा वर्षांनंतर आपल्या आईवडिलांबरोबर राहण्याची संधी प्राप्त झाली आहे.