कारण जाणून घेतल्यावर व्हाल थक्क
श्वानांचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. परंतु कुठल्याही श्वानाला तुम्ही पदवी स्वीकारताना पाहिले आहे का? अमेरिकेत एका श्वानाला मानद डिप्लोमा (पदविका) प्रदान करण्यात आला आहे. हा मानद डिप्लोमा एका प्रतिष्ठित कॉलेजकडून प्रदान करण्यात आला आहे. न्यू जर्सीमध्ये लॅब्राडोर-गोल्डन रिट्रीवर प्रजातीच्या श्वानाला मानद पदविका देण्यात आली आहे. 6 वर्षीय या श्वानाचे नाव जस्टिन आहे. एका सोहळ्यादरम्यान त्याचा हा सत्कार करण्यात आला आहे. जस्टिनची मालकीण ग्रेस मारियानीने देखील याच कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तिला विद्यापीठाकडून बॅचलर ऑफ सायन्स इन एज्युकेशनच्या पदवीने गौरविण्यात आले. तिच्यासोबत या श्वानाला डिप्लोमा प्रदान करण्यात आला, कारण हा श्वान सदैव तिच्यासोबत असायचा. मारियानी व्हिलचेअरला खिळून असते, तिच्या मदतीसाठी जस्टिन सदैव तिच्यासोबत सावलीप्रमाणे वावरतो. जस्टिनने देखील मारियानी प्रमाणेच शिक्षण पूर्ण केल्याचे विद्यापीठाचे मानणे आहे. विद्यापीठाने जस्टिन या श्वानाला डिप्लोमा प्रदान करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 15 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत विद्यापीठ प्रमुख जोसेफ ई न्यारे हे मारियानीला पदवी तर जस्टिनला पदविका प्रदान करताना दिसून येतात. जस्टिन स्वत:चा डिप्लोमा तोंडाने पकडत असताना आणि उपस्थित लोक टाळ्या वाजवत असल्याचे यात दिसून येते. मारियानीला या श्वानाबद्दल मोठी आत्मियता आहे. या श्वानाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशाप्रकारच्या श्वानाला सर्व्हिस डॉग देखील म्हटले जाते.