बारा लाख लीटर पाणी, चार टन फोमचा वापर : दलाच्या शंभरहून अधिक जवानांची आगीशी झुंज,अग्निशमनबरोबरच नौदल, एमपीटीचेही सहकार्य
प्रतिनिधी /म्हापसा
पिळर्ण येथील बर्जर बेकर कंपनीच्या गोदामाला मंगळवारी दुपारी लागलेली आग तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बुधवारी दुपारी शमविण्यात अग्निशमन दलास अखेर यश आले. ही आग विझविण्यासाठी दीडशेहून अधिक बंबचा वापर झाला. चार टन फोम, तब्बल 12 लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. अग्निशमन दलाचे 100 हून अधिक जवान घटनास्थळी दिवसरात्र काम करीत होते. शिवाय नौदल, एमपीटी, संरक्षण दलाचेही आग विझविण्यात सहकार्य घेण्यात आले, अशी माहिती अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली.
या दुर्घटनेत प्रथमच अत्त्याधुनिक ‘हायटर्न टेबल लेडर’चाही आग विझविण्यासाठी वापर करण्यात आला. गोव्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भीषण आग मानली जात आहे. रासायनिक बॅरल्सच्या स्फोटामुळे ही आग सतत भडकत राहिली. बर्जर बेकरच्या गोदामास काल मंगळवारी दुपारी भीषण आग लागली होती. सातत्याने पाणी, फोममिश्रित फवाऱयाचा मारा करूनही काही ठिकाणी काल बुधवारी दुसऱया दिवशी देखील आग धुमसणे सुरुच होते.
आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश : अजित कामत
उत्तर गोवा अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी अजित कामत म्हणाले की, आगीवर आम्ही नियंत्रण मिळविले असून आतापर्यंत 4 टन फोम तसेच 12 लाख लिटर पाणी आग विझविण्यासाठी वापरले आहे. आगीवर नियंत्रण आल्यानंतर सकाळी चार जेसीबीच्या साहाय्याने येथील जळालेल्या वस्तुंचे ढिगारे (डेब्रिस) हटविण्याचे काम तसेच गोदामाचा स्लॅब मोडून पडल्याने ते हटविण्याचे काम सुरू होते. हा स्लॅब मोडून बेसमेंटवर पडला असून तिथेच प्रामुख्याने ही आग जास्त धुमसत आहे.
सर्वकाही सामान्य होत आहे : आलेक्स
पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची वीज मंगळवारी रात्री 11 वाजता पूर्ववत करण्यात आली असून सर्वकाही सामान्य होत आहे, असे आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.
नातेवाईकांच्या घरी घेतला आसरा
कंपनीच्या दोन किलोमीटर क्षेत्रातील स्थानिकांसाठी सरकारने मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार रात्रीच बहुतांश लोकांनी विशेषतः कंपनीच्या पायथ्याशी असलेल्या साळपे गावातील लोकांनी घरे बंद करून नातेवाईकांच्या घरी आसरा घेतला आहे. 70 घरातील शंभराहून अधिक लोकांचे स्थलांतर त्यांच्या नातेवाईकांकडे करण्यात आले आहे.
पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने अडचण
आगीनंतर पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून तळमजल्यावर पडला त्यामुळे तळमजल्यावरील आग विजविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदर स्लॅब हटविल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले जाऊ शकते, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी अजित कामत यांनी दिली.
ज्या ट्रकला आग लागली त्या ट्रकच्या चालकाने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांनी आग लागल्याची माहिती दिल्यानंतर ट्रक आहे तिथे टाकून पळून जाणे आपणास भाग पडले. ज्या ठिकाणी ट्रक पार्क केला होता तेथून बाहेर पडेपर्यंत आगीने भडका घेतला होता. तसेच आगीमुळे कारखाना परिसरात स्फोट सुरू झाले होते. त्यामुळे आम्हाला तेथून धाव घ्यावी लागली, असे ट्रकचालकाने दिली.
आगीमुळे होणारे प्रदूषण मर्यादेत : महेश पाटील
लागलेल्या आगीनंतर झालेल्या प्रदूषणावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देखरेख करण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रदूषणाची पातळी वाढली नसून ते अद्यापही मर्यादेत आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.
अग्निशमन दल अजूनही सज्ज : पर्रीकर
सध्या परिसरात 5 बंब तयार ठेवण्यात आले आहेत तर एक बंब साळपे गावात तयार ठेवण्यात आला आहे. दलाच्या जवानांनी जोखीम पत्करून अत्यंत धैर्याचे काम केले. मंगळवारी रात्रभर अग विझवण्याचे काम सुरूच होते, अशी माहिती पिळर्ण अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांनी दिली.