संजीत हेगडे देसाई यांचे उद्गार
प्रतिनिधी /मडगाव
‘गुगल ट्रान्सलेट’ सेवेमध्ये कोकणी भाषेचा समावेश करणे हे तंत्रज्ञानाचे कौशल्य अंगीकारून भाषा पुढे नेण्याचे पहिले पाऊल आहे. या सेवेमुळे अनुवादात गुंतलेल्या अनेक लोकांना आणि इतर भाषा शिकण्यास मदत होईल, असे गुगलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक बिझनेस सिस्टीम्समध्ये कार्यरत असलेले गोव्याचे सूपुत्र संजीत हेगडे देसाई म्हणाले.
गुगल ट्रान्सलेट सेवेमध्ये कोकणी भाषेचा समावेश करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, तसेच कोकणी समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावल्याबद्दल संजीत हेगडे देसाई यांचा कोकणी भाषा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत श्री. हेगडे देसाई बोलत होते. यावेळी त्यांनी कोकणी भाषा समृद्ध करण्यासाठी योगदान देण्याचे वचन दिले.
ज्ये÷ कोकणी लेखक ऍड उदय भेंब्रे यांच्या हस्ते संजीतचा सत्कार करण्यात आला. ऍड. भेंब्रे यांनी तसेच चेतन आचार्य यांनी हेगडे देसाई यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून कोकणी जनतेने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पुढे जाण्याचे आवाहन केले.
संजीत हेगडे देसाईंचे योगदान कोकणी भाषेच्या इतिहासात कायमस्वरूपी स्मरणात राहील. दर्जेदार साहित्य प्रकाशित करून इंटरनेटवर भाषा फुलावी यासाठी आम्हाला कोकणी लेखक आणि कोकणी माणसांचे अधिकाधिक योगदान हवे आहे. आम्हाला प्रमाणही हवे आहे असे ऍड भेंब्रे यावेळी म्हणाले. 25 ते 30 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अशाच प्रकारच्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला.
कोकणी कार्यकर्ते चेतन आचार्य म्हणाले की, कोकणीच्या भल्यासाठी एकजुटीने काम करण्याची हीच वेळ आहे. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.