1416 वर्गखोल्या धोकादायक, दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष : शहरी भागातही अनेक शाळांमध्ये जीर्ण शौचालये, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
बेळगाव : शैक्षणिक वर्षाला सोमवार दि. 29 पासून प्रारंभ होत आहे. पुढील वर्गात गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र जीर्ण झालेल्या वर्गखोल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागणार आहे. 2021-22 च्या आकडेवारीनुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात तब्बल 1416 वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्या केव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही अनेक शाळांमध्ये शौचालये, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठा अपघात घडण्यापूर्वी तरी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे. सरकारी शाळांचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी जिल्हा पंचायतीमार्फत पुरविला जातो. परंतु हा निधी नेमका जातो कुठे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कारण ज्या शाळांमध्ये पटसंख्या सर्वाधिक आहे. अशा शाळांमध्येही वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्या धोकादायक स्थितीत आहेत. काही शाळांमध्ये शाळेचे प्लास्टर वरचेवर कोसळत असते. तर छताला गळती असल्याने पावसाळ्याच्या दिवसात वर्गांमध्ये छत्री घेऊन बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 457 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 959 वर्गखोल्या जीर्ण स्थितीत आहेत. मागील दोन वर्षांत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात अनेक वर्गखोल्या कोसळल्या आहेत. खानापूर तालुक्यात मागील वर्षी पावसाळ्यामध्ये शाळा कोसळल्याने तात्पुरत्या स्वरुपात दुसरीकडे शाळा भरवावी लागली. वर्गखोल्यांचे बांधकाम करताना निकृष्ट प्रतिचे साहित्य वापरल्याने छताला गळती लागणे, भिंतींना भेगा पडणे, प्लास्टर कोसळणे, वर्गामध्ये पाणी येणे असे प्रकार घडत आहेत.
अनेक शाळांचा प्लास्टर धोकादायक
शहरातील माळी गल्ली येथील शाळेचा प्लास्टर जीर्ण झाला आहे. यासंदर्भात वेळोवेळी शिक्षणाधिकारी व जि. पं. ला माहिती देऊन देखील अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आलेले नाही. तर अनगोळ येथील शाळा क्र. 6 मध्ये प्लास्टर कोसळू लागले आहे. छताच्या सळ्या दिसत असून त्यामधून पाणी खाली पडत आहे. काही वर्गांमध्ये बसण्यासाठी पाठ देण्यात आले आहेत. शहरातील शाळांची जर ही अवस्था असेल तर ग्रामीण भागात शाळांची स्थिती काय असेल याचा विचार न केलेलाच बरा.
जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या
- तालुका वर्ग खोल्या
- बेळगाव शहर 51
- बेळगाव ग्रामीण 18
- खानापूर 65
- चिकोडी 161
- निपाणी 116
धोकादायक वर्गखोल्यांमध्ये वर्ग भरवू नयेत…
सोमवारपासून शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार आहे. काही शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक असून त्याठिकाणी वर्ग भरवू नयेत, अशा सूचना प्रत्येक शाळा मुख्याध्यापकांना करण्यात आल्या आहेत. याचबरोबर जीर्ण वर्ग खोल्या, शौचालय, जेवणाची खोली यांचा वापर करू नये, असे आदेश बजावण्यात आले आहेत.
– आर. विशाल (आयुक्त शिक्षण विभाग)