धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : देवदर्शन-महाप्रसादासाठी भाविकांची ठिकठिकाणी गर्दी
वार्ताहर /सांबरा
श्रावण मासानिमित्त शेवटच्या श्रावण सोमवारी तालुक्यातील ठिकठिकाणी विविध मंदिरांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सकाळपासूनच अभिषेक, पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. तर महाप्रसाद घेण्यासाठी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
श्री सिद्धेश्वर मंदिर, कणबर्गी
रविवार दि. 10 रोजी मंदिरामध्ये शिधा आणण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 नंतर गाडे मिरवणुकीला प्रारंभ झाला. वाजतगाजत मिरवणूक रात्री 8 च्या सुमारास मंदिराकडे पोहोचली. रात्री 12 नंतर पहाटे 5 पर्यंत अभिषेक, पूजा अर्चा आदी कार्यक्रम झाले. सकाळी 10 पासून महाप्रसादाला सुरुवात झाली. येथील श्री सिद्धेश्वर मंदिर हे शहर व तालुक्यातील जागृत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे दर सोमवारी भाविकांची गर्दी असते. सोमवारी महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद वाटपाचे काम सुरू होते. महाप्रसाद घेण्यासाठी बेळगाव शहरासह तालुक्यातील सांबरा, मुतगा, कुडची, काकती, होनगा, शिंदोळी, मुचंडी, कलखांब, अष्टे, हालगा, तारीहाळ, सुळेभावी, मास्तमर्डीसह इतर गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर मंदिर, मुचंडी
येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात पहाटे 5 वा. अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सकाळी गावातील गदगीपासून वाजतगाजत पालखी निघाली व मंदिराकडे येऊन पोहोचली. मंदिरामध्ये पूजा, अर्चा झाल्यानंतर दुपारी 12 वा. महाप्रसादाला सुरुवात झाली. महाप्रसाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी गाऱ्हाणे घातल्यानंतर महाप्रसादाची सांगता झाली तर रात्री गदगीपर्यंत पालखीसेवा झाली.
ब्रह्मलिंग मंदिर, निलजी
सकाळी मंदिरात अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर गावातील लक्ष्मीमंदिरापर्यंत ब्रह्मलिंग मंदिरापर्यंत वाजतगाजत शिधासाहित्य नेण्यात आले. यावेळी मंदिरात अलौकिक ध्यान मंदिरचे शिवानंद गुरुजी यांच्या हस्ते पूजन करून महाप्रसाद तयार करण्यास प्रारंभ केला. दुपारी 4 नंतर महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद सुरू होता. महाप्रसाद घेण्यासाठी बसवन कुडची, देवराजअर्स कॉलनी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरासह तालुक्यातील हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.
श्री कलमेश्वर मंदिर, बाळेकुंद्री खुर्द
येथील श्री कलमेश्वर मंदिरामध्ये पहाटे 5 वा. अभिषेक घालण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पूजा, अर्चासाठी दुपारपर्यंत भाविकांची गर्दी होती. दुपारी 4 वा. महाप्रसादाचे पूजन करून महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
धामणे, देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी येथे महाप्रसाद
श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारचे औचित्य साधून ग्रामीण भागातील धामणे, देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
धामणे येथील बसवाण्णा मंदिर
येथील बसवाण्णा देवाला परव कमिटीच्यावतीने सोमवारी सकाळी अभिषेक घालण्यात येवून देवाची विधिवत पूजन करण्यात येवून महाआरती झाली. त्यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे दुपारी 2 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धामणे, कुरबरट्टी, देवगणहट्टी येथील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
देसूर ब्रह्मलिंग मंदिर
येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण सोमवारनिमित्त दि. 11 रोजी सकाळी येथील ब्रह्मलिंग गणेशोत्सव मंडळाच्यावतीने ब्रह्मलिंग मंदिरात देवाचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मंडळाच्यावतीने दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नंदिहळ्ळी येथील ब्रह्मलिंग मंदिर येथील ब्रह्मलिंग मंदिर आवारात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गावकऱ्यांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते. सकाळी ब्रह्मदेवाचे पूजन गावकऱ्यांतर्फे करण्यात येवून दुपारी 2 वाजता देवाला नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
राजहंसगड श्री सिद्धेश्वर मंदिर
येथे श्रावण सोमवारनिमित्त दि. 11 रोजी सकाळी सिद्धेश्वर देवाला अभिषेक घालून देवाचे विधिवत पूजन करण्यात आले. श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी राजहंसगडावरील महाप्रसादाचा लाभ घेतला.