सेन्सेक्स 152 अंकांनी प्रभावीत ः एनटीपीसी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील मागील काही दिवसांपासूनचा घसरणीचा प्रवास काही संपल्याचे दिसत नाही. यामध्ये दिवसागणिक निराशादायी वातावरण जोर पकडत असल्याचे दिसत आहे. यामध्ये चालू आठवडय़ातील तिसऱया व बाजाराच्या सलग चौथ्या सत्रात बुधवारी जागतिक बाजारात मिळताजुळता कल राहिला होता. याचा नकारात्मक परिणाम म्हणून भारतीय बाजारात घसरणीचे सत्र कायम राहिल्याचे दिसून आले.
विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱयामुळे शेअर बाजारात चढउतारच्या वातावरणात अंतिम क्षणी सेन्सेक्स 152.18 अंकांनी प्रभावीत होत मागील दहा महिन्यातील सर्वात निच्चांकी पातळी गाठत निर्देशांक 52,541.39 वर बंद झाला आहे. मागील चार सत्रात सेन्सेक्सने जवळपास 2,778.89 अंकांची घसरण नोंदवली आहे. या पाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 39.95 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,692.15 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील एनटीपीसीमध्ये सर्वाधिक 2.02 टक्क्यांची घसरण राहिली आहे. यासोबतच इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, विप्रो, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा स्टील, लार्सन ऍण्ड टुब्रो, भारतीय स्टेट बँक, एशियन पेन्ट्स आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग लाभासह बंद झाले.
जागतिक घडामोडींमध्ये फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीचे निर्णय येण्याच्या अगोदरच गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. यामध्ये प्रारंभी मजबूत कल राहिला होता, परंतु दुपारपर्यंत विक्रीच्या दबावात मुख्य निर्देशांक प्रभावीत होत बंद झाला. यामुळे जगातील प्रमुख बाजाराच्या नजरा फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीकडे लागून राहिल्या आहेत. आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरिया, जपान यांचे शेअर बाजार नुकसानीत होते.