किमतीत होईल पूर्ण जगाची भ्रमंती
घराच्या परिसरात लावण्यात येणाऱ्या झाडांची किमत अत्यंत कमी असते. काही रुपयांमध्ये याची रोपं मिळत असतात. परंतु एका झाडाची किंमत इतकी अधिक आहे की त्याच्या किमतीत पूर्ण जगभ्रमंती करता येते. एका झाडाची किंमत ही कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. या झाडाचे नाव व्हाइट पाइन बोनसाई असून ते जपानमध्ये आढळून येते. 2011 च्या आंतरराष्ट्रीय बोनसाई संमेलनात जपानी व्हाइट पाइन बोनसाई झाड 1.3 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले गेले होते. भारतीय चलनात हा आकडा 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक होतो. या झाडाला जगातील सर्वात महागडे झाड मानले जाते.
प्रसिद्ध बोनसाई ट्री आर्टिस्ट सेइजी मोरीमे यांनी या झाडाची विक्री एका जपानी खासगी संग्राहकाला केली होती. हे झाड ‘मियाजिमा’ देवदार प्रजातीतील असून ते उंच पाने, मजबूत अन् वळणदार खोड असणारे झाड आहे. या बोनसाई झाडाचे आयुर्मान 800 वर्षांपर्यंत असते.
याचबरोबर ताकामात्सु पाइन बोनसाई झाडाची किंमत देखील सुमारे 10 कोटी रुपये आहे. हे देखील जपानी व्हाइट पाइन बोनसाई झाडाच्या प्रजातीचेच आहे. 2012 मध्ये याची सुमारे 10 कोटी रुपयांमध्ये विक्री करण्यात आली होती. ते एक अत्यंत परिपूर्ण आकाराचे जपानी व्हाइट पाइन बोनसाई होते, ज्यात एका पौराणिक वृक्षाची सर्व वैशिष्ट्यो होती. या झाडाची उंची 1 मीटरपेक्षाही कमी होती.