जत , प्रतिनिधी
जत तालुक्यातील सिंदूर येथे गेल्या वर्षी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी दुपारी गंगाप्पा पराप्पा मगदूम (वय 33) यांचा डोक्यात, तोंडावर, दगड घालून गंभीर जखमी केले होते. त्याला मिरज शासकीय रुग्णालय दाखल करण्यापूर्वीच तो मयत झाला. या खून प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जत पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ सदाशिव पराप्पा मगदूम (वय २८, रा. सिंदूर, ता. जत ) यांने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसात कल्लाप्पा मुरग्याप्पा देसारेट्टी, शंकर मुरग्याप्पा देसारेट्टी व एक अल्पवायीन (सर्व रा. देसारेट्टी वस्ती, सिंदूर, ता. जत) अशा तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय, जत पोलिसांचे दोन पथक कर्नाटक व सीमा भागात आरोपीच्या शोधावर रवाना झाले आहे.पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, देसरेट्टी व मगदूम वस्ती शेजारीच आहेत. दोन्ही कुटुंबात अनेक वर्षांपासून वाद होता. शुक्रवारी सकाळी किरकोळ कारणातून दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचे रूपांतर सिंदूर गावातील बसवेश्वर चौक येथे मारामारीत झाले. यामध्ये गंगाप्पा मगदूम व वरील तिघांमध्ये जोरदार मारामारी झाली. यात मगदूम हा जखमी झाला होता. तो जतकडे उपचारासाठी निघाला होता.
दरम्यान, वरील तिघांनी पुन्हा गंगाप्पा मगदूम याला वाटेत गाठत येथील फ्रेंड्स धाब्यासमोर त्यांच्यावर पुन्हा डोक्यात, तोंडावर, चेहऱ्यावर, दगडाने गंभीर दगडाने हल्ला चढवला. यामध्ये मगदूम याची शारीरिक परिस्थिती अस्वस्थ झाली होती. घटनेची माहिती मिळताच मगदूम यांचे नातेवाईकांनी त्यांना मिरज शासकीय रुग्णालय येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मगदूम यांच्या मृतदेहवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर रात्री उशिरा जत पोलिसात वरील तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.