सांगली प्रतिनिधी
सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करण्याचा सपाटा सरकारने लावल्या असल्याने त्याला विरोध करण्यासाठी सांगलीतून व्यापक लढा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली रविवारी 22 ऑक्टोबर रोजी एक व्यापक मोर्चा काढण्यात येणार असून त्यात सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्व स्तरातील नागरिक युवकांना आणि कामगारांना सहभागी करण्यात येणार आहे.
कंत्राटीकरण व खासगीकरण विरोधात सांगलीत होणाऱ्या या मोर्चाच्या नियोजनबाबत शांतिनिकेतन सांगली येथे बैठक झाली. त्यात 22 ऑक्टोबरला रविवारी मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. विविध सामाजिक, राजकीय, विद्यार्थी, कर्मचारी संघटना पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, सुशिक्षित बेरोजगार, सामाजिक संघटना, यांना एकत्र करत चुकीच्या धोरणाना संविधानिक मार्गाने विरोध करण्याबाबत चर्चा झाली. सर्वांनी भविष्यातील धोके ओळखून सर्वांनी एकजूट दाखवत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सरकारी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह आमदार अरुण लाड, धनाजी गुरव, व्ही. वाय. पाटील, सिकंदर जमादार, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.