प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर यांचे प्रतिपादन ; नवचेतना युवक संघातर्फे अनिश कुमार पोके यांचा गौरव
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील कलाकारांनी मूर्ती कलेतही लक्ष घालून मूर्ती मूर्ती कलेत पारंगत व्हावे, आणि देशात गोव्याचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर यांनी पेडणे येथे केले.
नवचेतना युवक संघ पेडणे आयोजित पोलिसातील युवा कलाकार अनिशकुमार अनंत पोके यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने संजय हरमलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समाजसेवक मनोहर तळवणेकर, मोपा पोलीस स्थानकाचे निरीक्षक महेश केरकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, कासरवर्णे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गाड आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी एखादी कलाकृती कलाकार निर्माण करतो त्यावेळी तो कलाकार ती स्वतः कृती निर्माण करत नाही तर त्या कलाकारातील जो आत्मा आहे आणि कलेचा जो वसा आहे त्या द्वारेच ही कलाकृती जीवंत ठेवून आपलं काम करावं जेणेकरून राज्याचे लौकिक वाढेल. अनिश कुमार पोके हे पोलीस खात्यात नोकरी करतात, ही सेवा बजावत असताना त्यांनी आपली कला प्राणपणाने जोपासलेली आहे.
नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर बोलताना म्हणाले की,अनिशकुमार पेशाने पोलिस असला तरी त्याने त्याच्यातील कलाकार जिवंत ठेवला आहे. तो एक उत्कृष्ट हरहुन्नरी कलाकार आहे. त्याच्यातील कलाकार त्याला सेवेतील आव्हाने पेलण्यास प्रेरित करतो. शिग्मोत्सव, गणेशोत्सव मंडळांची सजावट, कार्निवल अशा प्रकारच्या विविध सणाद्वारे कलेची जोपासना अनिश पोके यांनी केली आहे. अनिशकुमार एक पेडणेकर या नात्याने आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे.
चित्रकार पी.ए सूर्यवंशी बोलताना म्हणाले की, अनिशकुमार पोके यांचे कलागुण हेरून त्यांचा येथे गौरव करून नवचेतना युवक संघाने एक चांगला पायंडा घालून दिलेला आहे. अशा कलाकारांना कौतुकाची थाप हवी असते हे काम नवचेतना युवक संघाने केलेले आहे. प्रमुख पाहुणे संजय हरमलकर यांच्या हस्ते कलाकार अनिशकुमार पोके यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. सूत्रसंचालन महादेव गवंडी यांनी केले. तरनारायण कोरगावकर यांनी आभार मानले.