पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन : दहा हजारांहून अधिक क्रीडापटूंचा सहभाग,पाच हजारांहून अधिक महिला क्रीडापटू
पणजी : गोव्यात यंदा प्रथमच होणारी 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वऊपात पार पडणार आहे. या स्पर्धेत सुमारे दहा हजारांहून अधिक क्रीडापटू सहभागी होणार असल्याने गोव्यातील ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जागतिक विक्रम ठरेल (वर्ल्ड रेकॉर्ड), असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. स्पर्धेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असून, येत्या 26 ऑक्टोबर रोजी 12 हजारांची आसन क्षमता असलेल्या फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. पर्वरीतील मंत्रालयात काल शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा खात्याच्या सचिव श्वेतिका सचन, जीटीसीसीचे प्रमुख अमिताभ शर्मा उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असून, 20 ऑक्टोबरपर्यंत सर्व तयारी पूर्ण होईल. या राष्ट्रीय स्पर्धेचे गोव्याला यजमानपद मिळण्यासाठी सुमारे 12 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी काही दिवस अगोदर काही खेळांतील सामने होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटनास उपस्थिती लावणार असल्याने आपण त्यांचे आभार मानतो. स्पर्धेत प्रथमच सर्वाधिक 43 खेळांचा समावेश आहे. देशातील पारंपरिक 8 खेळ, 5 जलक्रीडा यांचा सहभाग असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील क्रीडापटूंना लाभ
मंत्री गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची माहिती देताना सांगितले की, राज्यातील नवोदित तसेच उमद्या खेळाडूंना या स्पर्धेचा लाभ होणे हे खात्याचे पहिले लक्ष्य आहे. राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने याचा फायदा निश्चितच राज्यातील खेळाडूंना होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा गोव्यातील खेळाडूंना नक्कीच होईल. पावसाच्या व्यत्ययामुळे 30 सप्टेंबरपर्यंत खेळांची तयारी होऊ शकली नसल्याचेही ते म्हणाले.
क्रीडा पर्यटनक्षेत्राचा बहुमान
गोव्यात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने क्रीडा पर्यटन क्षेत्र म्हणूनही गोव्याला बहुमान प्राप्त होईल, असा आशावाद मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला. क्रीडा क्षेत्राचा विकास करण्याच्यादृष्टीने ही स्पर्धा निश्चितच उपयोगी ठरेल. या स्पर्धेत सुमारे 49 टक्के महिला खेळाडू सहभागी होणार आहेत, तर एकूण 10 हजारहून अधिक क्रीडापटू सहभागी होतील, असेही ते म्हणाले.
अशी असेल 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
- एकूण खेळ 43
- एकूण क्रीडा प्रकार 750
- एकूण क्रीडापटू 10 हजारांहून अधिक
- एकूण महिला खेळाडू 5 हजारांहून अधिक
- एकूण स्पर्धा ठिकाणे 28
- गोव्याचा सहभाग विविध 36 क्रीडा प्रकारात