पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पर्वरी
गोवा हे जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ आहे. पण आज आपली ओळख ‘सन, सेट आणि सी’ अशीच आहे. हे चित्र बदलण्याची गरज असून आपल्या गोव्याला फार जुनी संस्कृती आणि वारसा आहे. त्याची ओळख पर्यंटकाना करून देण्याची खरी गरज आहे त्यासाठी राज्यात ग्रामीण आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून ठोस पावले उचलली जात असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे सदस्य तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
गोवा पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक प्रकल्पाचे नियोजन केले असून काही प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात मोठय़ा संख्येने पर्यटक येत असून त्यांच्यासाठी गोवा हे नेहमीच पसंतीचे ठिकाण आहे. समुद्र किनाऱयाव्ययतिरिक्त गोव्यात येणारे पर्यटक हे, पर्यावरणपूरक तसेच वैद्यकीय पर्यटनाकडे आकर्षित होत असून त्याला चालना देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असेही मंत्री खवंटे म्हणाले.
आजच्या बैठकीत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध महोत्सवांचे आयोजन करणे तसेच विविध साधनसुविधांचा विस्तार करणे यावर चर्चा झाली. राज्यात ग्रामीण पर्यटनाची सुरुवात झाल्यास ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळणार. त्यांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागणार नाही. गोवा पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ एकत्रित काम करून पर्यटन क्षेत्रात भरीव काम करणार असल्याची माहिती खंवटे यांनी दिली.