अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत : नवीन इमारत बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
इनाम बडस येथील जुन्या शाळेची इमारत पावसामुळे कोसळली आहे. गुरुवारी रात्री ही शाळा कोसळली असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शाळा इमारत कोसळली असल्याचे शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
या शाळेची इमारत जीर्ण झाली होती. गेल्या 20 वर्षांपासून ही शाळा बंद आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा ही इमारत पाडवून त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांतून होत आहेत.
जुन्या इमारतीच्या बाजूलाच विद्यार्थ्यांसाठी खेळण्याकरिता ग्राऊंड आहे. तसेच बाजूलाच अंगणवाडी शाळा आहे. सध्या मराठी शाळेचे विद्यार्थी गेल्या काही वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या मंदिराजवळील शाळेच्या इमारतीत बसतात. या गावात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागात तर अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. संततधार पावसामुळे गुरुवारी रात्री जुन्या शाळेची इमारत पूर्णपणे कोसळली आहे. शुक्रवारी सकाळी ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थांनी शाळेची पाहणी केली.
नवीन इमारत बांधण्याची मागणी
किमान आता तरी प्रशासन व शिक्षण खात्यामार्फत शाळेची कोसळलेली इमारत काढून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याची मागणी गावकऱयांमधून होत आहे. याठिकाणी नवीन इमारत बांधल्यास गावातील विद्यार्थ्यांना सोयीचे ठरणार आहे. तसेच ग्राऊंडही उपलब्ध होईल, अशी माहिती शिक्षणपेमी नागरिकांनी दिली.