5400 वर्षांपासून पृथ्वीवर असल्याचा संशोधकांचा दावा
दक्षिण अमेरिकन देश असलेल्या चिलीमध्ये एका निर्जन खोऱयात एक प्राचीन वृक्ष अस्तित्वात आहे. या विशाल वृक्षाला पाहिल्यास तो आकाशात कुणीतरी छत्री धरल्याचा भास होतो. कदाचित हा जगातील सर्वात जुना वृक्ष असू शकतो. एका नव्या कॉम्प्युटर मॉडेलद्वारे ‘ग्रॅन अबुएलो’ नावाचा हा वृक्ष सुमारे 5400 वर्षे जुना असू शकतो असे कळले आहे. जर याच्या तारखेची पुष्टी झाली तर ग्रॅन अबुएलो सद्यकाळात सर्वात जुन्या वृक्षाचा अधिकृत विक्रम बाळगणाऱया कॅलिफोर्नियाच्या ब्रिसलकोन पाइनपेक्षा 600 वर्षे जुना असणार आहे.
ग्रॅन अबुएलोच्या योग्य वयाची अद्याप पुष्टी झालेली नाही. याकरता डेंड्रोक्रोनोलॉजी प्रक्रियेची गरज भासते. या प्रक्रियेत झाडांच्या सालींचे वैद्यकीय विश्लेषण करण्यात येते. कुठल्याही वृक्षाचे वय निश्चित करण्यासाठी ही सर्वात अचूक पद्धत मानण्यात येते. या मॉडेलसाठी वापरण्यात आलेला डाटा सार्वजनिक करण्यात आलेला नाही. तसेच तो कुठल्याही जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेला नाही.
संकटात वृक्ष
पॅरिसमध्ये क्लायमेट अँड एनव्हॉयरन्मेंट सायन्सेसन लेबोरट्रीमधील हवामान तज्ञ आणि हे मॉडेल तयार करणारे संशोधक जोनाथन बारिचविच यांनी हा वृक्ष संकटात असल्याचे म्हणत त्याचे रक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. पर्यटनामुळे या वृक्षाची स्थिती खराब होत आहे. याचबरोबर वृक्षावर हवामान बदलाचा प्रभाव पडत असल्याचे ते म्हणाले.
किती जुना आहे वृक्ष
ग्रॅन अबुएलो प्रत्यक्षात एलर्स नावाच्या वृक्षाची प्रजाती आहे. हा वृक्ष चिलीच्या एलर्स कॉस्टेरो नॅशनल पार्कमध्ये आहे. जोनाथन यांच्यानुसार हा वृक्ष सुमारे 60 मीटर उंच आहे. प्रारंभी हा वृक्ष 3500 वर्षे जुना असल्याचे मानले जात होते. परंतु वैज्ञानिकांनी कधीच योग्य पद्धतीने या वृक्षाच्या वयाचे विश्लेषण केले नाही. 2020 साली जोनाथन आणि त्यांच्या सहकाऱयांनी झाडाला नुकसान न पोहोचविता त्यात एक छोटे छिद्र पाडले आणि युमळे झाडाच्या सालींचे 246 तुकडे मिळविले गेले. झाडाच्या व्यासाचा आकार 4 मीटर असल्याने याच्या मध्यभागापर्यंत जाता आले नाही. याचमुळे वास्तविक माहिती मिळू शकलेली नाही. परंतु कॉम्प्युटर मॉडेलद्वारे हा वृक्ष 5400 वर्षे जुना असल्याचे समजते.