प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेतील सर्व्हरडाऊन झाल्यामुळे अनेकांची कामे प्रलंबित राहिली आहेत. तब्बल 5 ते 6 दिवस हे सर्व्हरडाऊन होते. बेंगळूर येथे बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले होते. शनिवारी सर्व्हरची समस्या सुटल्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित कामांना सुरुवात केली आहे.
सर्व्हरडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेला ताटकळत थांबावे लागत होते. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागत होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. सर्व्हरडाऊनबद्दल विचारले असता बेंगळूरवरूनच समस्या असल्याचे सांगितले जात हेते. सध्या सर्वच कामे संगणकाद्वारे केली जात आहेत. त्यामुळे त्यावरच सर्वजण अवलंबून आहेत. मात्र अचानक सर्व्हरडाऊनमुळे समस्या निर्माण होत आहेत.
महानगरपालिकेतील सर्व्हरडाऊन झाल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. यातच जनतेतूनही तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत होती. शनिवारी सर्व्हर सुरू झाले आहे. त्यामुळे कामांना सुरुवात करण्यात आली. आता सोमवारपासून नियमित कामांना सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.