पुणे / वार्ताहर :
पुणे पोलीस दलात शीघ्र कृती दल विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी अँडिज पर्वत रांगेतील दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेटिना स्थित सर्वोच्च शिखर माउंट अकानकागुआ (23 हजार फूट उंची) सर केले आहे. गुरव यांनी 23 मे 2021 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यातील ही पाचवी मोहीम फत्ते झाली आहे.
शासकीय कर्तव्य करत असताना कामाचा व्याप सांभाळून गुरव यांनी या मोहिमेची तयारी केली. मुंबई ते दुबई आणि दुबई ते रिओ द जनरिओ पुन्हा रिओ द जनरिओ ते बुनिस एअरस व शेवटी बुनिस ते मेंडोंजा असा विमान प्रवास करत ते मोहिमेपर्यंत पोहचले. याबाबत गुरव म्हणाले, माउंट अकानकागुआ पर्वतावर या काळात मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी होते. उणे 20 डिग्री पर्यंत असणारे तापमान तसेच हा पर्वत दोन्ही महासागरांच्या मध्ये असल्याने जोरदार वारा असतो. या शिखराचा माथा हा 23 हजार फूट उंचीवर असल्याने ऑक्सीजन पातळी कमी असते. बर्फ वृष्टी या भागात मोठया प्रमाणात होत असल्याने चांगले हवामान मिळाल्यानंतरच वैद्यकीय चाचणी करुनच गिर्यारोहकांना पुढील वाटचाल करता येते. 23 मे 2021 जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर जगातील सातही खंडातील सातही सर्वोच्च शिखरे एका वर्षामध्ये सर करण्याचा मानस केला, परंतु कोरोनामुळे त्यात अडचणी आल्या. त्यानंतर 26 जुलै 2021 रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस, 15 ऑगस्ट 2021 रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो शिखर, 29 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट कोजी अस्को शिखर सर केले आणि आता माझ्या या गिर्यारोहणाच्या मोहिमेतील पाचवी मोहीम संपन्न झाली आहे.
अधिक वाचा : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुण्यातील चार नृत्य समुहांचा सहभाग
या मोहीमेसाठी पोलीस महासंचालक (प्र) संजय कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त आर राजा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.