नासाकडून निर्मिती ः चंद्रावरील मानवी मोहिमेची पूर्वतयारी
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
नासाचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली अंतराळ प्रक्षेपक सोमवारी अंतराळाच्या दिशेने झेपावणार आहे. नासा 50 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर माणसांना चंद्रावर पाठविण्याची तयारी करत आहे. 1972 नंतर पहिल्यांदाच चंद्रावर माणूस पुन्हा एकदा स्वतःचे पाऊल ठेवणार आहे. याकरता नासा अर्टेमिस 1 मोहिमेंतर्गत स्वतःची पहिली टेस्ट फ्लाइट अंतराळात पाठवत आहे. हे अंतराळयान सोमवारी फ्लोरिडा येथील लाँचपॅडवरून झेपावणार आहे.
अर्टेमिस 1 मोहिमेच्या अंतर्गत ओरियन अंतराळयान पाठविण्यात येणार आहे. यात सर्वात वरच्या भागात 6 जणांना सामाविण्यासाठी डीप-स्पेस एक्लप्लोरेशन कॅप्सूल आहे. यात 322 फूट लांब अन् 2600 टन वजनाचे स्पेस लाँच सिस्टीम मेगारॉकेट असेल. हे रॉकेट सोमवारी सकाळी 8.33 वाजता लिफ्टऑफ होणार आहे.
चंद्राकरता मानवी मोहीम साकारण्यापूर्वी होणारे हे परीक्षण आहे. यात सध्या कुठलाही सदस्य जाणार नाही, ओरियनमध्ये माणसांच्या जागी पुतळय़ांना बसविण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून नासा नेक्स्ट जनरेशन स्पेससूट आणि रेडिएशन लेव्हलचे मूल्यांन करणार आहे. पुतळय़ांसोबत स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठविण्यात येणार आहे. या टॉयज कॅप्सूलच्या चहुबाजूला तरंगणार असून झीरो ग्रॅव्हिटी इंडिकेटर म्हणून काम करणार आहेत. ओरियन चंद्राच्या चहुबाजूला सुमारे 42 दिवसांचा दीर्घ प्रवास करणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास 2025 च्या अखेरपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिला महिला आणि दोन अंतराळवीरांना उतरविण्यात येणार आहे. दुसरी टेस्ट फ्लाइट अर्टेमिस 2 मे 2024 मध्ये पार पडणार आहे. या परीक्षणात 4 जणांना चंद्राच्या मागील भागात नेण्यात येत असले तरीही ते चंद्रावर लँडिंग करणार नाही.
वैज्ञानिक अंतराळयानातून रोपांची बियाणे देखील पाठवत आहेत. याचबरोवर शेवाळ अन् यीस्ट देखील पाठविण्यात येत असून याद्वारे रेडिएशनच्या प्रभावाचे अध्ययन करण्यात येणार आहे. बायोलॉजिकल सिस्टीम अंतराळात कशाप्रकारे राहतात आणि कशाप्रकारे विकसित होतात हे पाहिले जाणार आहे.