’आप’चा निर्धार, समस्या, प्रश्न पाठविण्याचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षातर्फे येत्या विधानसभा अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यात येणार असून लोकांनी आपल्या समस्या, प्रश्न पक्षाकडे पाठवावे, असे आवाहन आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष ऍड. अमित पालेकर यांनी केले आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी वेळ्ळीचे आमदार प्रुझ सिल्वा आणि बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांची उपस्थिती होती. राज्यातील नागरिकांनी त्यांचे प्रश्न ईमेलद्वारे पाठवावे किंवा पणजीतील महालक्ष्मी मंदिराशेजारी असलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यालयात लेखी स्वरूपात पोहोचते करावे, असे पालेकर यांनी सांगितले. पक्षाकडे पोहोचलेल्या प्रत्येक प्रश्नाला अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडून उत्तरे मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे पालेकर म्हणाले.
आपल्या भागातील प्रत्येक समस्या, अडचणी, तक्रारी, प्रश्न विधानसभेत उपस्थित व्हावे व त्यांचे निराकरण व्हावे, अशी नागरिकांची इच्छा असते. तरीही आजपर्यंतचा इतिहास पाहिल्यास सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत क्वचितच पोहोचतात, हेच सत्य आहे. त्यामुळे ते काम आता आप करणार आहे. एखाद्या राजकीय पक्षाने प्रथमच असे पाऊल उचलले असून लोकांना स्वतःचा आवाज विधानसभेत ऐकवण्याची संधी मिळणार आहे.
विधानसभेचे कामकाज राजकीय हेतूने हायजॅक न होता किंवा अकारण वेळ वाया न जाऊ देता विधानसभा ही खऱया अर्थाने लोकांच्या समस्यांचे निराकरण करणारी जागा बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर लोकांना भेडसावणाऱया समस्यांचे निराकरण करणारी स्पष्ट उत्तरे तसेच उपाययोजनांची मागणी करू, असे प्रुझ सिल्वा यांनी सांगितले.
अनेकदा विधानसभा अधिवेशनात लोकांचे प्रश्न बाजूला सारून विरोधक केवळ सरकारचे बाहुले बनलेले आम्ही पाहिले आहे. 2017 ते 2022च्या विधानसभेत लोकशाहीची कशी हत्या झाली तेही आम्ही पाहिले आहे. यंदाची विधानसभा वेगळी असेल. आता आम आदमीचे प्रतिनिधी विधानसभेत पोहचले आहेत. त्यामुळे लोकांनीही आमच्या माध्यमातून स्वतःचे तसेच सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्यांवर जास्तीत जास्त प्रश्न पाठवावेत, असे आवाहन व्हेन्झी यांनी केले. त्याशिवाय आम्ही शून्य तासाचा फायदा घेऊ, खासगी सदस्य विधेयके आणि अन्य मार्गांचा अवलंब करून सरकारकडून उत्तरे मिळविण्याचे प्रयत्न करू असेही व्हेन्झी यांनी पुढे सांगितले.