कोसोवोमध्ये नाटोचे 30 सैनिक जखमी : सर्बियाचे सैन्य
वृत्तसंस्था/ कोसोवो
युक्रेन युद्धादरम्यान युरोपमध्ये आणखी एक वाद चिघळत चालला आहे. कोसोवोमध्ये सर्बियाच्या निदर्शकांच्या हल्ल्यात नाटोचे 30 शांततारक्षक सैनिक जखमी झाले आहेत. अशा स्थितीत 700 अतिरिक्त सैनिक पाठविण्याचा निर्णय नाटोने घेतला आहे. सध्या नाटोचे 3800 शांततारक्षक कोसोवोमध्ये तैनात आहेत.
पश्चिम बाल्कनसाठी आणखी 700 सैनिक तैनात केले जाणार आहेत. गरज भासल्यास अतिरिक्त राखीव बटालियन हायअलर्टवर ठेवू असे नाटोचे महासचिव जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले आहे. तर याचदरम्यान सर्बियाने स्वत:च्या सैन्याने अलर्टवर ठेवले आहे.
एका बटालियनमध्ये सर्वसाधारणपणे 300 ते 1 हजार सैनिक असतात. अतिरिक्त सैनिकांच्या तैनातीचा निर्णय योग्य असून याद्वारे सुरक्षा मजबूत करता येणार असल्याचे नाटोचे कमांडर अॅडमिरल स्टुअर्ट मुन्स्च यांनी म्हटले आहे. हंगेरी आणि इटलीचे 30 शांततारक्षक सैनिक जखमी झाले आहेत. जाळपोळीमुळे हे सैनिक जखमी झाल्याची माहिती नाटोने दिली आहे. कोसोवोमध्ये 1998 पासून वाद सुरू आहे, अल्बानी वंशाया बंडखोरांनी तेव्हा सर्बियाच्या शासनाच्या विरोधात बंड केले होते.
या बंडाच्या विरोधात सर्बियाने अत्यंत क्रूर मोहीम राबविली होती. या हिंसेत 13 हजार लोक मारले होते, ज्यातील बहुतांश जण अल्बानियन होते. यानंतर नाटोच्या सैन्याने 1999 मध्ये हस्तक्षेप करत सर्बियाला कोसोवोच्या भागातून माघार घेण्यास भाग पाडले होते. यानंतर तेथे शांततारक्षक सैनिक तैनात करण्यात आले होते. सर्बियाने कोसोवोला देश म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. कोसोवोमध्ये अल्बायिन वंशाच्या लोकांचे प्रमाण अधिक आहे, परंतु देशाच्या उत्तर भागात सर्बियाच्या सीमेनजीक मोठ्या संख्येत सर्बियन वंशीय लोकांचे वास्तव्य आहे.
सर्बियन वंशाच्या लोकांनी बहिष्कार टाकलेल्या निवडणुकीत अल्बानियन वंशाचे लोक निवडून आले आहेत. यामुळे तेथे नवा वाद निर्माण झाला आहे. हे निवडून आलेले लोक महापालिकेच्या इमारतींमध्ये शिरल्यावर सर्बियन वंशाच्या लोकांनी विरोध केला आहे. यानंतर कोसोवोच्या पोलिसांनी अश्रूधूराचा वापर करत जमावाला पांगविले. याच्या प्रत्युत्तरादाखल सर्बियाने स्वत:च्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे. याचबरोबर कोसोवोच्या सीमेवर सैन्य तैनात केले आहे. सर्बियाला चीन अन् रशियाची साथ मिळत आहे. चीनने अनेक घातक शस्त्रास्त्रs सर्बियाला पुरविली आहेत. युक्रेन युद्धात सर्बियाने रशियाला पाठिंबा दर्शविला आहे.