रास्ता रोकोमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत
प्रतिनिधी/ गडहिंग्लज
आफ्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांची विविध प्रकारची देणी अद्याप मिळाली नसल्याने गेले दिडवर्ष उपविभागीय कार्यालयासमारे आंदोलन सुरू आहे. सेवानिवृत्त कामगारांची देणी कारखान्याच्या वार्षीक ताळेबंद अहवालात समाविष्ट करून घेतल्या नसल्याने प्रशासकांच्या विरोधात तीव्र भुमिका घेत या कामगारांनी मंगळवारी गडहिंग्लजला मुख्य रस्ता 4 तास रोखून धरला. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी 3 वाजता प्राधिकृत अधिकाऱयांचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सेवानिवृत्त कामगार संघटनेचे शिवाजीराव खोत, रणजित देसाई, बाळासाहेब लोंढे, महादेव मांगले, लक्ष्मण देवार्डे, सुरेश पाटील, दिनकर खोराटे, सुभाष पाटील, बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान कामगारांनी गडहिंग्लज बंद च्या केलेल्या आवाहनाला मात्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले नाही.