भव्यदिव्य मंदिरांतून देखावे वेधताहेत लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
देखावे व नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती पाहण्यासाठी शहरातील रस्ते गर्दीने फुलू लागले आहेत. सायंकाळनंतर नागरिक गणेश दर्शनासाठी रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत.
बेळगावमध्ये मोठय़ा जल्लोशात गणेशोत्सव साजरा केला जातो. शहर व उपनगरांमध्ये 370 हून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. सजीव देखावे व भव्य दिव्य गणेशमूर्ती हे येथील विशेष आहे. त्यामुळेच बेळगावसह परिसरातील नागरिक गणेशमूर्ती पाहण्यासाठी बेळगावमध्ये दाखल होत असतात. श्रीमूर्ती विसर्जनासाठी अवघे तीन-चार दिवस उरले असल्याने त्यातच पावसाने साथ दिल्याने भाविक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध आले होते. त्यामुळे मंडळांना देखावे अथवा भव्य मूर्ती साकारता आल्या नव्हत्या. यावषी मात्र उत्साह वाढला असून, अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. काही मंडळांनी बिबटय़ाचा विषयही हाताळला आहे. भव्य दिव्य मंदिरांचे देखावे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे कुटुंबांसमवेत शहरातील गणराया पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.