तलवार, चाकूचा वापर झाला नसल्याचे उघड : सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
प्रतिनिधी / बेळगाव
अंबडगट्टी, ता. कित्तूरजवळील एका कल्याण मंटपासमोर वाहने उभी करून झोपलेल्या प्रवाशांना लुटल्याच्या घटनांना कलाटणी मिळाली आहे. तलवार व चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची माहिती पसरली होती. पोलिसांनी त्याची खातरजमा केली असून झोपलेल्या प्रवाशांच्या खिशात हात घालून त्यांच्याजवळील रोकड व मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले आहे.
दि. 22 मे व 12 जून रोजी या घटना घडल्या आहेत. लांबपल्ल्याचा प्रवास करणारे प्रवासी काहीकाळ आपली वाहने उभी करून विश्रांती घेतात. अंबडगट्टी येथील एका कल्याण मंटपासमोर कार उभी करून विश्रांती घेणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात आले होते. या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. मात्र, संबंधितांनी पोलिसात फिर्याद दिली नाही.
दोन दिवसांपासून सेशल मीडियावर या घटनांसंबंधीची माहिती पसरली. तलवार व चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची ती माहिती होती. याप्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना दिली. त्यानुसार बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसकोटी आदी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी अंबडगट्टीत जाऊन या प्रकरणाचा तपास हाती घेतला.
कल्याण मंटपातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. तलवार किंवा चाकूचा धाक दाखवून लूट केली नसल्याचे फुटेजवरून दिसून येते. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हेगारांचा शोध
22 मे रोजी यमकनमर्डी येथील प्रवाशांचे मोबाईल व रोकड पळविण्यात आली आहे. 12 जून रोजीही घटना घडली आहे. या दोन्ही दिवशी ज्यांचे ऐवज पळविण्यात आले, त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला असून त्यांना फिर्याद देण्यास सांगण्यात आले आहे. यासंबंधी बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्याशी संपर्क साधला असता प्रकार उघडकीस आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. लुटीसाठी तलवार व चाकूचा धाक दाखविण्यात आला नाही, हे फुटेजवरून उघडकीस आले आहे, असे त्यांनी सांगितले.