वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 साली होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे स्वरुप पूर्ण निराळे राहिल. ही स्पर्धा नव्या स्वरुपात खेळविली जाणार आहे. या आगामी स्पर्धेत एकूण 20 संघांचा समावेश राहणार असून चार गटात ते विभागण्यात येतील. स्पर्धेतील पहिली फेरी संपल्यानंतर सुपर-8 फेरीला प्रारंभ होईल.
आयसीसीच्या 2021 आणि 2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिली फेरी पार पडल्यानंतर सुपर 12 टप्प्याला प्रारंभ करण्यात आला होता. पण आता 2024 च्या स्पर्धेत पहिल्या फेरीतील चार गटातील आघाडीचे दोन संघ सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर सुपर 8 टप्प्यातील दोन गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. त्यानंतर अंतिम सामना खेळविला जाईल. आयसीसीच्या या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आतापर्यंत 12 संघांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. ही आगामी स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणार आहे. यजमान विंडीज आणि अमेरिका हे पहिले आघाडीचे दोन संघ राहतील. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या सुपर 12 गटातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आघाडीचे आठ संघ तसेच सुपर 12 गटातील पहिले चार संघ या आगामी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. विद्यमान विजेता इंग्लंड, उपविजेता पाकने 2024 च्या या स्पर्धेसाठी आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहेत. आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 मानांकनातील सर्वोत्तम संघ तसेच अफगाण आणि बांगलादेश यांनीही या आगामी स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.