खड्डे सुद्धा नीट बुजवले नाहीत सर्वसामान्य सातारकरांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा
सातारा प्रतिनिधी
सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता होती. सध्या प्रशासक म्हणून अभिजित बापट यांच्याकडून कारभार पाहिला जात आहे. पालिकेच्या माध्यमातून शहरातील खड्डे मुजवण्याचे काम सुरु आहे. हे खड्डे प्रभावीपणे मुजवले गेले पाहिजेत. तसे काम होताना दिसत नाही. मात्र, पालिकेचे काम सुरु असताना माजी नगरसेविकेचे पती मात्र तेथे जाऊन फोटो सेशन करत आहेत. तेच फोटो सोशल मीडियावर फिरवत आहेत. त्यांच्या या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या.
सातारा विकास आघाडीच्या कार्यकाळात काही नगरसेविकांचे पतीराज हे न चुकता सातारा पालिकेत यायचे. नगरसेविका एकवेळी यायच्या नाहीत पण हे पतीराज अगदी नगराध्यक्षांच्या केबीनपासून ते मुख्याधिकाऱयांच्या केबीनपर्यत त्यांचा वावर असायचा. सर्वसाधारण सभेत त्यांच्या पत्नींनी विषय कोणते मांडायचे हेही पतीराजच बसून ठरवायचे. अगदी पालिकेत आल्यानंतर कोणत्या अधिकाऱयांना, कोणत्या कर्मचाऱयांना गाठायचे, भेटायचे आणि काम फक्त आपल्याकडे कसे येईल यासाठी पतीराजांचाच लकडा असायचा. पतीराज मंडळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच तोंडपाठ झाली होती.