पुलवामा अन् शोपियांमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी दक्षिण काश्मीरमधील दोन जिल्हे पुलवामा आणि शोपियांमध्ये थिएटरचे (चित्रपटगृह) उद्घाटन केले आहे. लवकरच जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक जिल्हय़ात अशाप्रकारचे थिएटर तयार केले जाणार आहे. याचबरोबर श्रीनगरच्या सोमवारा भागातील काश्मीरमधील पहिले मल्टीप्लेक्स चालू आठवडय़ात सुरू होणार असून यात 520 आसनांची क्षमता असणारी तीन थिएटर्स असतील, अशी माहिती सिन्हा यांनी दिली आहे.
या थिएटर्समध्ये कुठल्याही चित्रपटाचे स्क्रीनिंग नसेल तेव्हा यांचा वापर खोऱयातील मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे. काश्मीर खोऱयातील विद्यार्थी इंजिनियरिंग आणि अन्य अभ्यासक्रमांसाठी श्रीनगर येथे येत असतात. 80 च्या दशकात बंद पडलेले एक जुने 120 आसनक्षमतेचे थिएटर पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती जादूज या कंपनीचे अध्यक्ष राहुल मेहरा यांनी दिली आहे.
1980 च्या दशकाच्या अखेरपर्यंत काश्मीर खोऱयात सुमारे 12 सिंगल स्क्रीन थिएटर्स होती, परंतु दहशतवादी संघटनांकडून धमकी मिळाल्यावर ही थिएटर्स बंद करण्यात आली होती. 1990 दशकाच्या अखेरीस काही थिएटर्स पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, परंतु सप्टेंबर 1999 मध्ये लाल चौकातील रीगल सिनेमावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे हे प्रयत्न सोडून द्यावे लागले होते. नीलम आणि ब्रॉडवे ही दोन थिएटर्स जोखीम पत्करून सुरू करण्यात आली होती, परंतु दहशतवाद्यांच्या धमकीमुळे प्रेक्षकांनी पाठ फिरविली होती.