ग्राहक-हेस्कॉमच्या कर्मचाऱयांमध्ये वादावादीचे प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
डिजिटल सेवांना प्राधान्य देण्यात आल्याने ग्राहक घरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर विद्युतबिल भरत आहेत. एकीकडे सरकारने डिजिटल सेवा सुरू केल्या असल्या तरी दुसरीकडे मात्र या सेवा डोकेदुखीच्या ठरू लागल्या आहेत. ऑनलाईन बिल भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रांगेमध्ये उभे राहून बिल भरण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
हेस्कॉमच्या वेबसाईटसह गुगल पे, फोन पे, पेटीएम, ऍमॅझोन पे यासह इतर मोबाईल वॉलेटवरून विद्युतबिल भरता येत होते. परंतु मागील काही महिन्यांपासून फोन पे व गुगल पेवरून बिल भरताना अडचणी येत आहेत. बऱयाचवेळा भरलेल्या विद्युतबिलाची रक्कम पुन्हा ग्राहकाच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे ग्राहक व हेस्कॉमच्या कर्मचाऱयांमध्ये वादावादीचे प्रकार होत आहेत. बिल न भरल्यास हेस्कॉमचे कर्मचारी विद्युतजोडणी तोडत आहेत. त्यावेळी आपण ऑनलाईन बिल भरले आहे, असे ग्राहक सांगत आहेत. परंतु प्रत्यक्ष बिल भरलेली रक्कम पुन्हा ग्राहकाच्या खात्यात जमा झालेली असते.
पैसे जमा होण्यासाठी किमान तीन दिवस गरजेचे
मोबाईल वॉलेटवरून बिल भरल्यानंतर संबंधित बँकेच्या खात्यातून रक्कम हेस्कॉमच्या खात्यात जमा होते. यासाठी अपडेट होण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागतो. परंतु बरेच ग्राहक बिल भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोबाईलवरून बिल भरत आहेत. त्यामुळे बिल अपडेट होण्यापूर्वीच हेस्कॉमचे कर्मचारी बिल भरले नसल्याने कनेक्शन तोडण्यासाठी ग्राहकांच्या घरी पोहोचत आहेत.
ऑनलाईन पेमेंट व्यवस्था सुधारण्याची गरज
सध्या 60 टक्के ग्राहक फोन पे, गुगल पे यासारख्या मोबाईल वॉलेटवरून विद्युतबिल भरत आहेत. नोकरदारवर्गांकडे वेळ कमी असल्याने हेस्कॉम अथवा बेळगाव वन कार्यालयात जावून बिल भरले जात नाही. घरबसल्या मोबाईलवरून विद्युतबिल भरणे सोयीचे ठरत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात ग्राहक ही व्यवस्था वापरत आहेत. परंतु हेस्कॉमने ही ऑनलाईन पेमेंट व्यवस्था सुधारण्याची गरज आहे.