वार्ताहर/उत्तूर
उत्तूरमध्ये नागरी वस्तीत असलेल्या अवधूत ज्वेलर्स या दुकानात जबरी चोरीचा प्रयत्न झाला, हत्यारबंद चोरट्यांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा हा प्रयत्न फसला. तीन पैकी एका चोरट्यास नागरिकांनी जेरबंद करून पोलिसांच्या हवाली केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास ज्वेलर्सचे मालक दिनकर कुंभार हे आपले दुकान बंद करून घरी निघण्याच्या तयारीत असतानाच एका मोटारसायकल वरून तीन अज्ञात इसम त्यांच्या समोर आले . त्यापैकी दोघांनी कुंभार यांना मारहाण करून त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने तिथेच बाजूला उभे असलेल्या सुशांत आपके या तरुणाने धाडसाने पुढे होत चोरट्यांच्या गाडीची किल्ली काढून घेण्याचा प्रयत्न करून त्यांना अडविले मात्र या झटापटीत चोरट्यांनी सुशांत वर धारदार शस्त्राने वार केला या मध्ये त्याच्या कपाळावर जखम झाली तरी देखील त्याने एका चोरट्यास हिसडा मारून गाडीवरून खाली पाडले, दरम्यान तिथे उपस्थित तरुणांनी या चोरट्याना पकडण्याचा प्रयत्न केला असता हवेत गोळीबार करीत यातील दोन चोरटे मोटारसायकल वरून पळून गेले. सापडलेल्या एका चोरट्यास नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
हे ही वाचा : महाद्वाररोड चार दिवस वाहतूकीसाठी बंद
सुशांत आपके याच्यासह तरुणांच्या धाडसाचे कौतुक
नागरिकांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता या चोरट्यांनी हवेत गोळीबार केला या वरून हे चोरटे सराईत असावेत असा कयास नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यांच्याकडे जीवघेणी हत्यारे असताना देखिल सुशांत आपके या तरुणाने जिवावर उदार होत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्याच्यावर केलेल्या हल्ल्यात त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली. सुशांत व इतर तरुणांनी दाखविलेल्या धाडसाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. घटनास्थळी सापडलेली प्राणघातक हत्यारे नागरिकांनी पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत.