पणजी : ‘स्टार्टअप 20 एन्गेजमेंट’ गटाची तिसरी बैठक आज शनिवार दि. 3 व उद्या 4 जून रोजी पणजीत होत आहे. बैठकीत जी 20 सदस्य देशांचे प्रतिनिधी तसेच भारतातील स्टार्टअप परिसंस्थेतील वरिष्ठ सदस्य एकत्र येऊन सहकार्य, कल्पनांची देवाणघेवाण आणि जागतिक स्टार्टअप क्षेत्रासह उद्योगविकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. जागतिक स्टार्टअप आणि उद्योजकता लँडस्केप, स्टार्टअप 20 हा गट स्टार्टअप आणि उद्योजकता यासह महत्त्वाच्या मुद्यांवर संवाद आणि सहयोगाला प्रोत्साहन देतो.
स्टार्टअपमधून अर्थिक विकासाला चालना
‘प्रभावी संकल्पनेचे सामर्थ्य, स्टार्टअपच्या माध्यमातून जगाला आकार देण्याचा सामूहिक निर्धार याचा परिपाक म्हणजे स्टार्टअप 20 ची गोवा बैठक आहे. सहयोगाच्या माध्यमातून, वैचारिक आदानप्रदान करत आणि महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा या माध्यमातून आपण उद्योजकतेच्या भावनेला प्रोत्साहन देऊ शकतो आणि त्याद्वारे आर्थिक विकासाला चालना देऊ शकतो. एकत्रितपणे काम केल्यास स्टार्टअपची भरभराट होईल आणि नाविन्यतेला बंधने नसतील, असे विश्व तयार करू शकतो, अशी भावना गोवा राज्याचे जी 20 नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी व्यक्त केली.
धोरण मसुद्यावर एकमतास प्राधान्य
स्टार्टअप 20 ने हल्लीच विविध क्षेत्रातील, प्रदेशांतील लोकांकडून मागवलेल्या अभिप्रायांचा अभ्यास करून स्टार्टअपसाठी धोरणाचा प्राथमिक मसुदा बनवलेला आहे. या मसुद्यावरही एकमत बनवण्याबाबत या बैठकीत प्राधान्य दिले जाणार आहे. या धोरण मसुद्यामध्ये जी20 राष्ट्रांमधील स्टार्टअप परिसंस्थेचा विकास व विस्तार करण्याबाबत या कार्यगटाचा दृष्टिकोन, ध्येय, उद्दिष्टे काय असावीत तसेच या क्षेत्राच्या विकासाबाबतच्या प्रमुख शिफारशींचा समावेश आहे. या बैठकीत नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सची यशोगाथा सादरीकरण, स्टार्टअप 20 एक्स या विचारमालिकेचा भाग म्हणून चर्चासत्राचे आयोजन, स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्याच्या संधी आणि मसुद्यामध्ये सादर केलेल्या संकल्पनांची अंमलबजावणी आणि त्याचे लाभ यावर चर्चा यांचा समावेश असेल. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, बैठकीस उपस्थित प्रतिनिधींसाठी महामेजवानीचेही आयोजन केले जाणार आहे. गोव्यातील वैविध्यपूर्ण व श्रीमंत सांस्कृतिक व कलावारसा अनुभवत या मेजवानीचा आस्वाद पाहुण्यांना घ्यायला मिळणार आहे. तसेच विविध सहभागीय उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिनिधींना विविध घटकांना भेटण्याची तसेच गोव्यातील पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.