कोल्हापूर प्रतिनिधी
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात यंदा पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.त्यानुसार सकाळी साडेसात ते दहा या वेळेत राजवाडा परिसरात विविध कार्यक्रम होणार आहेत.
कोल्हापुरातील शिवराज्याभिषेक सोहळा शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा तर मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सहा जून रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार असून यावेळी मर्दानी खेळ, सनई चौघडा वादन, पोवाडा, शौर्य गीत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर या कार्यक्रमास याज्ञसेनीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असेल.