प्रतिनिधी /सांखळी
युवकांना नवनवीन कल्पना सूचतात, त्या कृतीत आणण्याची संधी मिळाली की निर्माणाचा आनंद मिळतो. निर्मिती केलेल्या वस्तूंची कुणी दखल घेतली, कुणी कौतुक केले, कुणी खरेदी केली तर आनंद द्विगुणित होतो, प्रोत्साहन मिळते. जन शिक्षण संस्थान गोवातर्फे आपल्या लाभार्थींना प्रोत्साहन मिळावे, ज्यामुळे ते स्वावलंबी होतील यासाठी प्रदर्शन व विक्री दालन उपलब्ध करून देते, यामुळेच लाभार्थींना व्यवसाय करण्याची, मार्केटिंग कौशल्य शिकण्याची संधी मिळते म्हणून हा स्तुत्य उपक्रम चालू ठेवावा, असे मत प्रथितयश चित्रकार शिवानंद खेडेकर यांनी प्रदर्शन व विक्री केंद्राच्या उद्घाटनसमयी व्यक्त केले.
जनशिक्षण संस्थान गोवा व स्वादिष्ट फुड्स (चाट स्ट्रीट) सांखळी यांच्या सहयोगातून या तीन दिवशीय प्रदर्शन व विक्री केंद्राचे दीपप्रज्वलित करून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जन शिक्षण संस्थान गोवाचे अध्यक्ष प्रा. दत्ता नाईक, संचालक श्रीहरी आठल्ये, स्वादिष्ट फुड्सच्या संचालिका अदिती बापे व सोनल पित्रे उपस्थित होत्या. अशा सामाजिक उपक्रमांमध्ये आपलाही सहभाग असावा, यासाठी शिवस्मृती हॉल उपलब्ध करून देतो ज्यामुळे अपाल्याला समाधान मिळते, असे पुढे शिवानंद खेडेकर म्हणाले.
जन शिक्षण संस्थान गोवा च्या सहाय्याने अनेक महिला स्वावलंबी होत आहेत. महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याचे ध्येय ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो असे प्रा. दत्ता नाईक यांनी सांगितले. श्रीहरी आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. लोकांनी आजादी का अमृत महोत्सव वर्षात हरवळे येथील पांडवकालीन लेण्यांच्या परिसरात आयोजित प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सोनल पित्रे यांनी आभार मानले. समृद्धी गणपुले यांनी स्वागत, परिचय व सूत्रसंचालन केले.