राष्ट्रवादीचे नुवे गटाध्यक्ष फ्रान्सिस डिमेलो यांची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी रेमेडियल क्लास वा अतिरिक्त वर्ग घेण्याच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुपारी 2 नंतर शाळा सोडावी लागते. यामुळे पालकांमध्ये, विशेषतः विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये, शाळेपासून घराकडे येईपर्यंत मुलांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर बालरथ बससेवेचा वापर करून या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नुवे मतदारसंघ गटाध्यक्ष फ्रान्सिस डिमेलो यांनी केली आहे.
मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मागणी उचलून धरली. यासंदर्भात डिमेलो यांनी वेर्णा येथील मारिना इंग्लिश हायस्कूलचे मुख्यध्यापक तसेच शिक्षण संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. दुपारच्या वेळी शाळेच्या आजुबाजूच्या परिसरात क्वचितच लोक असतात. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला चालणाऱया विद्यार्थ्यांना भरधाव वाहनांचा फटका बसण्याची जास्त शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान वा अपहरण करू इच्छिणाऱया समाजविघातक घटकांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणारे त्यावेळी कोणीही असत नाही याकडे या पत्रांतून लक्ष वेधण्यात आले आहे, अशी माहिती डिमेलो यांनी दिली.
वरील गोष्टी पाहता, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यासाठी बालरथ सेवा उपलब्ध करून द्यावी अशी माझी विनंती आहे. त्यामुळे पालकांची चिंता कमी होण्यास मदत होईल. ही अपेक्षा शिक्षण संचालक निश्चिंतच पूर्ण करतील, असा विश्वास डिमेलो यांनी व्यक्त केला आहे.