कराडच्या कोयना पुलावर भीषण अपघात; सांगवडचे आजी-आजोबा जखमी
प्रतिनिधी/ कराड
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील येथील कोयना नदीच्या पुलावर सोमवारी सायंकाळी मालट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील अवघ्या सात वर्षांचा नातू आराध्य नितीन कुंभार हा चिमुकला जागीच ठार झाला. तर आजोबा बाळकृष्ण मारूती कुंभार (वय 70), आजी कुसुम बाळकृष्ण कुंभार (वय 65, सर्व रा. सांगवड, ता. पाटण) हे जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघातात चिमुकल्या आराध्यचा हकनाक बळी गेल्याने कुंभार कुटुंबासह सांगवड परिसरावर शोककळा पसरली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण कुंभार व त्यांच्या पत्नी कुसुम या नातू आराध्यला घेऊन सांगवडवरून कराडला कामानिमित्त आले होते. काम उरकल्यावर ते तिघेजण दुचाकीवरून पुन्हा सांगवडकडे निघाले होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कोयना पुलावर आल्यावर कराड ते सातारा लेनवर भरधाव मालट्रक व दुचाकीची धडक झाली. धडक एवढी भीषण होती, की दुचाकीवरील तिघे मालट्रकच्या खाली सापडले. यात चिमुकल्या आराध्यला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बाळकृष्ण कुंभार व कुसुम पुंभार हे सुदैवाने बचावले.
महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, अपघात विभागाचे पोलीस खलील इनामदार, प्रशांत जाधव, कोयना वसाहतीचे पोलीस पाटील फिरोज मुल्ला हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना कराड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आराध्यच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघातामुळे आशियाई मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा झाल्यावर दस्तगीर आगा यांनी अपघातग्रस्त ट्रक पोलीस ठाण्यात आणला. अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.