पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष कुबल यांची माहिती
खानापूर ; खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजी पसरली होती. भाजपात बंडखोरी होईल, अशा पद्धतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यावर पडदा पडला असून तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी सर्व इच्छूक आणि तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून भाजपच्या उमेदवारास निवडून आणणार असा संकल्प जाहीर केला. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सुरेश देसाई, सदानंद पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार अरविंद पाटील यांनी एक वर्षापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. यावेळी त्यांना वरिष्ठांकडून काही आश्वासने देण्यात आली होती. यावेळी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. तसेच बाबुराव देसाई, सुरेश देसाई, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई यांनीही जोरदार प्रयत्न केले होते. मात्र उमेदवारी मिळवण्यात विठ्ठलराव हलगेकर यशस्वी झाले. त्यामुळे इच्छूक उमेदवारांत नाराजी पसरली होती. माजी आमदार अरविंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तर बैठक घेऊन वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र गेल्या चार दिवसात कार्यकर्त्यांबरोबर चारवेळा बैठक करून भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा प्रचार करणार तसेच भाजपमध्येच कायम राहणार असल्याचे अरविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रमोद कोचेरी यांनीही भाजपच्या विजयासाठी आपापसातील मतभेद दूर सारुन एकसंधपणे आम्ही कार्यरत राहणार आहोत. कार्यकर्त्यांनी कोणताही गैरसमज बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. भाजपात बंडखोरी होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमुळे पडदा पडला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले आहे.
आज उमेदवारी अर्ज भरणार
भाजपचा उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा उमेदवारी अर्ज बुधवार दि. 19 रोजी भरणार असल्याचे अरविंद पाटील यांनी सांगितले. येथील मलप्रभा क्रीडांगणावर एकत्र जमवून बसवेश्वर पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर आंबेडकर उद्यानातील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवस्मारकातील शिवपुतळ्याला हार घातल्यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करणार आहेत. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.