प्रतिनिधी /मडगाव
गोव्यातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका म्हणून नाव लौकीक असलेल्या डॉ. रूपा च्यारी यांच्या ‘सूत्रसंचालन ः अनुभव आणि आकलन’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांच्या हस्ते माशे येथील सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10.30 वा. होणार आहे.
काणकोण कोकणी कला केंद्रा तर्फे ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून याच कार्यक्रमात डॉ. रूपा च्यारी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला निवृत्त आयएएस अधिकारी दौलत हवालदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुणे येथील शारदा प्रकाशनने ‘सूत्रसंचालन ः अनुभव आणि आकलन’ हे मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. डॉ. रूपा च्यारी यांनी हिंदी भाषेतून एम. ए. पीएच.डी केली आहे. काणकोणच्या मल्लिकार्जुन महाविद्यालयात त्या हिंदी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेली 25 वर्षे सूत्रसंचालन क्षेत्रात कार्यरत आहे.
भांगराळे गोंय, गोवा युवा महोत्सव, यदोदामिनी पुरस्कार, अखिल भारतीय कोंकणी संगीत संमेलन, कलारंग, सरस कला सन्मान, कला गौरव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण, इफ्फी प्रादेशिक चित्रपट महोत्सव, इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अपरान्त मांड, चतुरंग, स्वरमंगेश, मांडो, अरेंगेत्रम, नुपूर महोत्सव, संगीत नाटक अकादमी महोत्सव, सुरश्री, ऑक्टेव, विश्व शांती परिषद, काव्यहोत्र, गोवा मुक्ती दिन परेड, गांधी शिल्फ क्राफ्ट बाजार, ज्ञानपीठ पुरस्कार, लोकोत्सव, कोकणी साहित्य संमेलन तसेच अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी आजवर केलेले आहे. सूत्रसंचालना बरोबरच त्यांनी अभिनयात देखील चमकदार कामगिरी बजावली आहे. कोकणी नाटय़ स्पर्धा तसेच कोकणी चित्रपटातून अभिनय केलाय.
वॉयस ओवर, डबिंग तसेच हिंदी आणि कोकणी कथांचा अनुवाद केलाय. अझो साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळातील परिसंवादात भाग घेतलाय. आजवर अनेक पुरस्कार ही त्यांना प्राप्त झालेले आहेत.