भोगावती/प्रतिनिधी
शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष व आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मंगळवारी दुपारी अचानक संचालक मंडळाच्या बैठकीत दिला होता.मात्र संचालक मंडळाने राजीनामा स्विकारण्यास स्पष्टपणे नकार दिला असून त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळून लावला असल्याची माहिती उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी मंगळवारी रात्री पत्रकारांशी बोलताना दिली.
भोगावती साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी १० वा आमदार पाटील यांच्या हस्ते झाला.त्यानंतर त्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत हा राजीनामा सादर केला होता.मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने सर्व जण अवाक झाले होते. राजीनामा देऊ नये म्हणून सर्व संचालक मंडळाने केलेली मागणी धुडकावून लावून अखेर त्यांनी राजीनामा दिला होता
दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापची एकहाती सत्ता संपुष्टात आणून पाटील यांनी अध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारली होती.तर त्यापूर्वीच्या संचालक मंडळाचे सलग २५ वर्षे नेतृत्व केले होते.