तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
कोरोना महामारीमुळे करमाळा शहर व ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गंभीर परिस्थितीत कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वेळेवर ऑक्सिजन व्हेंटीलेटरसह पंचवीस बेडची वैद्यकिय सुविधा उपजिल्हा रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
करमाळा तालुक्यात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मोठे सर्व सुविधांनियुक्त मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल नसल्याने अनेक नागरिकांना वेळेवर ऑक्सिजन व्हेंटीलेटर सुविधा न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने व प्रशासनाने याचे गांभीर्य न घेतल्यामुळे नागरिकांना कोरोना महामारीच्या काळात आपला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर सुविधा झाल्यास करमाळा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दुर होऊन गंभीर परिस्थिती असलेल्या कोरोना बाधित रुंग्णाची सोय होऊन अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे. तरी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर सर्व सुविधायुक्त अॉक्सिजन व्हेंटीलेटर व पंचवीस बेडची सुविधा करून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे यांनी केली आहे.