लाचखोर सरकारी अधिकाऱयांकडे सापडले घबाड – चौघे अटकेत
भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये लाचखोरीचा आरोप असणाऱया भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) चार अधिकाऱयांना सीबीआयने अटक केली. त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांवेळी एका लिपीकाच्या घरी मारलेल्या छाप्यात सीबीआयला तब्बल 2.17 कोटी रुपये आणि 8 किलो सोने व नोटा मोजण्याची मशीन असे मोठे घबाड सापडले आहे.
गुडगावमधील एका सिक्मयुरिटी एजन्सीने भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर लिपीक किशोर मीना आणि व्यवस्थापकासह तीन जणांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर पुढील कारवाई सुरू झाली होती. शुक्रवारी रात्री सीबीआयच्या पथकाने एफसीआयच्या लिपीकाच्या घरी टाकलेल्या छाप्यात मोठा दस्तावेज तपास अधिकाऱयांच्या हाती लागला आहे. भोपाळमधील छोला भागात लिपीक किशोर मीरा मीणाच्या घरी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयला भ्रष्टाचाराचे काही पुरावे देखील घरून मिळाले आहेत. अटक करण्यात आलेल्या तिन्ही व्यवस्थापकांचा भ्रष्टाचाराचा पैसा देखील लिपीक किशोर स्वतःकडेच ठेवत होता, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार किशोर मीना या अगोदर एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता.
छाप्यांवेळी लाचखोरीच्या रकमांचा तपशील असणारी एक डायरी सीबीआयला मिळाली. त्याआधारे पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अधिकाऱयांना भोपाळमधील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 2 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.